महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच कुस्ती, खासदार तडस संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:14 PM2022-11-02T16:14:22+5:302022-11-02T16:15:07+5:30
याबाबत बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले की, बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयोजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच आता राजकीय कुस्ती होत असल्याचं दिसून येत आहे. कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. मामासाहेब मोहोळ यांचे नातेवाईक मुरलीधर यांना यंदाच्या अधिवेशनाचा मान देण्यात आला आहे. परंतु लांडगे यांना मोहोळही चालत नाही आणि आम्हीही, असे मत खासदार रामदास तडस यांनी परखडपणे व्यक्त केले. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आखाडा सध्या गाजत आहे,
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. मात्र, लांडगेंच्या दाव्याला फोल ठरवत खासदार तडस यांनी त्यांना विरोध केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन रंगलेल्या वादावर तडस यांनी भूमिका मांडली.
याबाबत बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले की, बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयोजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अगोदरच बरखास्त झाली आहे. ऑल इंडिया कुस्तीगीर संघाने ती बरखास्त केली आहे. बाळासाहेब लांडगे यांनी भ्रष्टाचार केला. दहा वर्षात राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या नाहीत. महासंघाच्या पत्रांना उत्तर दिलं नाही. त्यामुळे बाळासाहेब लांडगे महासचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने स्पर्धा
भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून राज्यासाठी एका अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे (pune) राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबत निर्णय या समितीने घेतला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, लांडगे आणि रामदास तडस यांच्यातच कुस्ती सुरू झाल्याचं दिसून येत आहे.