‘कुस्ती’तही ‘तिने’ मारली बाजी
By admin | Published: November 7, 2016 01:23 AM2016-11-07T01:23:53+5:302016-11-07T01:23:53+5:30
कुस्ती म्हटलं की हा पुरुषी खेळ. अनेक वर्षांपासून या खेळावर पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. या रागंडी खेळाचे क्षेत्रही महिलांनी पादाक्रांत केले आहे.
डिंभे : कुस्ती म्हटलं की हा पुरुषी खेळ. अनेक वर्षांपासून या खेळावर पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. या रागंडी खेळाचे क्षेत्रही महिलांनी पादाक्रांत केले आहे. आंबेगाव तालुक्यातील साकोरे या गावातील स्वरा व सिद्धी, मुलींनी पोखरी येथे झालेल्या आंबेगाव तालुका महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत यश मिळवले आहे. महाराष्ट्र केसरीचे स्वप्न उराशी बाळगून या दोघी दृष्टीने आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्वरा व सिद्धी, साकोरे (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध पहिलवान जयवंत गाडे यांच्या मुली. घरात तीन पिढ्यांपासूनच कुस्तीची परंपरा. त्यामुळे लहानपणापासूनच मुलाप्रमाणेच गाडे यांनी दोघींना कुस्तीचे बाळकडू लहानपनापासून देत आहेत. सध्या शालेय स्पर्धांबरोबरच या मुली आंबेगाव तालुक्यातील नामांकित आखाड्यात महिलांच्या कुस्तीचे फड गाजवित आहेत. त्यांचे आजोबा, वडील व जयवंत हे स्वत:ही तालुक्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या चार तालुक्यांत नामांकित पहिलवान म्हणून ओळखले जातात. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या आखाड्यातून सलग तीन वर्षे विजयी होऊन येथील मानाची चांदीची गदा त्यांनी मिळविण्याचा मान मिळविला आहे. वडिलांच्या पायावर पाय ठेवून स्वरा व सिद्धी या दोन सख्ख्या बहिणीही सध्या वडिलांकडून कुस्तीचे धडे गिरवत आहेत. स्वरा इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून, सिध्दी आठवीच्या वर्गात शिकत आहे. एकीकडे शालेय शिक्षणाचे धडे घेता घेताच कुस्तीसारख्या नवख्या खेळातही त्या प्रावीण्य दाखवित आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या कुस्ती आखाड्यातून त्यांनी आजपर्यंत १ ढाल, २ ट्रॉफी व दोन मानाची पदकेही मिळविली आहेत. घरची परिस्थिती बेताचीच, मात्र घरातील परंपरागत कुस्तीची पे्ररणा घेऊन सध्या या दोन बहीणी कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.