प्रवासी वृद्धास लुटणारा चोरटा जेरबंद
By admin | Published: April 6, 2015 05:32 AM2015-04-06T05:32:08+5:302015-04-06T05:32:08+5:30
येथे करमाळा-पुणे एसटी बसमध्ये सहप्रवासी वृद्धास चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या चोरट्यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले.
भिगवण : येथे करमाळा-पुणे एसटी बसमध्ये सहप्रवासी वृद्धास चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या चोरट्यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या आपल्या नातूची भेट घेण्यासाठी दत्तात्रय दगडू पाटील (वय ६५, रा. घारगाव, ता. करमाळा) पुण्याकडे बसने निघाले होते. राशीनमध्ये त्यांच्याशेजारी सुरेश मोहनसिंग भाठी (वय ५३, रा. उरुळी कांचन) भिगवणचे तिकीट काढून बसला. राशीनपासून गाडी पुढे निघाल्यानंतर भाठी याने आपल्याजवळ असणारे चॉकलेट खाण्यासाठी काढून त्यातील एक सहप्रवासी पाटील यांना दिले. चॉकलेट खाल्ल्याने थोड्या वेळेत पाटील यांना गुंगी आली. तोपर्यंत गाडी भिगवण येथे येऊन थांबली असता, बसमधील अन्य प्रवासी चहा-पाण्यासाठी खाली उतरल्यानंतर भाठी याने पाटील यांचा खिसा चाकूने कापीत खिशातील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला.
या वेळी त्याच गाडीतून प्रवास करीत असलेल्या अझरुद्दीन पठाण, शब्बीर मुलाणी, तसेच नसिबा मुलाणी यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करताच भाठी याने धूम ठोकली. त्याच वेळी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमेश भोसले, शिवाजी काटे, संदीप लोंढे यांना हा प्रकार समजल्याने त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. भिगवण ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्यास जेरबंद करण्यात आले. तसेच पाटील यांना उपचारासाठी भिगवण येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. (वार्ताहर)