सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:56 AM2017-11-11T02:56:21+5:302017-11-11T02:56:25+5:30
‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी, आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी, उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,
पुणे : ‘‘सत्याच्या प्रेमात पडावे कविता लिहिण्यासाठी,
आयुष्याला थेट भिडावे कविता लिहिण्यासाठी,
उभ्या जगाची व्यथा असू दे छोटी अथवा मोठी,
गळ्यात पडूनी तिच्या रडावे कविता लिहिण्यासाठी...’’
या गझलकार रमण रणदिवे यांच्या कवितेने श्रोत्यांना कविता कशी लिहावी याची अनुभूती दिली.
निमित्त होते ‘लोकमत’तर्फे आयोजित काव्यॠतू स्पर्धेच्या लोगोच्या अनावरण सोहळ्याचे. कवितेचा प्रवास वैयक्तिक ते वैश्विक असा होत असतो. कवितेतून जगणे अणि जगण्यातून कविता उमटते, अशा शब्दांत मान्यवर कवींनी कवितेच्या गावाची सफर घडवली.
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने ‘काव्यऋतू’ पुरस्काराचा वितरण सोहळा व कविसंमेलन सोमवारी (दि. १३) आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या लोगोचा अनावरण सोहळा ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी, कवयित्री आश्लेषा महाजन या मान्यवरांच्या हस्ते झाला. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. या वेळी कवींनी कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया, कवितेची सद्य:स्थिती यावर प्रकाश टाकत कवितांचे सादरीकरण करत वातावरण ‘शब्द शब्द जपून ठेव’ असे केले.
रमण रणदिवे म्हणाले, ‘खेड्यापाड्यातही कविता लिहिली जात आहे, हे आशादायी चित्र आहे. कविता म्हणजे रक्त-मांसाच्या अस्तित्वाला आलेला जाणिवांचा मोहोर असतो. कविता माणसाच्या मनातला कोलाहल असतो. चुकून झालेला अथवा मुद्दाम केलेला स्पर्श स्त्रीला अचूक कळतो, त्याप्रमाणे मुद्दाम केलेली कविता चाणाक्ष रसिकाला अचूक कळते. त्यामुळे कविता अत्यंत जबाबदारीने लिहिली पाहिजे. मानवी नातेसंबंधातील लळ्यापेक्षा कवितेचा लळा अथांग असतो. कविता सर्वांत प्रामाणिक आणि सोबत करणारी असते. समाजाच्या संक्रमण काळात कवीने प्रामाणिकपणे मार्गदर्शन करायचे असते, मानवतेची मंदिरे वाचवायची असतात. ’
आश्लेषा महाजन म्हणाल्या, ‘मी कवितेतून बोलते, कवितेचा विचार करते म्हणून मला कविता स्फुरते. कविता सुचण्याचा क्षण अत्यंत आनंद देणारा असतो. दृकश्राव्य माध्यमे प्रभावी होत असतानाही कवितेचे अस्तित्व टिकून आहे. सध्या अभिरुची आणि अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाले आहे. या काळातही कविता अंतर्मुख करते. कवीने स्वान्तसुखाय लिहिलेली कविता इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. रसिकांना, वाचकांच्या मनात शिरून त्यांचेच भाव प्रतिबिंबित करणारी, शाश्वत मूल्ये देणारी, प्रकाशाकडे नेणारी कविता लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कवितेतून उमटणारे सकारात्मक भाव प्रेरणा देतात.’
जागतिकीकरणानंतर निर्माण झालेला जगण्याचा तीव्र संघर्ष आणि अस्तित्वाचा प्रश्न कवी ताकदीने मांडत आहेत. आजची मराठी कविता केवळ पुण्या-मुंबईची राहिलेली नाही, ग्रामीण भागातील कवीही दर्जेदार लेखन करत आहेत. कविता अत्यंत छान वळणावर पोहोचलेली आहे. कवितेची विविध विलोभनीय रूपे मनाला भावतात.’
कविता शिकवता येत नाही
१ कविता ही व्यक्तिसापेक्ष असते. कोणाला कोणती कविता आवडावी, हे पूर्णपणे व्यक्तीच्या अभिरुचीवर अवलंबून असते. कविता शिकवता येत नाही किंवा कार्यशाळा घेता येत नाही.
२ मी कविता करत नाही, तर ती आतून येते. जीवनाकडे कानांनी पाहतो आणि डोळ्यांनी ऐकतो, तेव्हा कविता निर्माण होते. कवी दु:खी असेल तरच त्याला दु:खी कविता सुचतात, असे होत नाही. कवी प्रत्येक जीवनप्रवाहात सामील होतो.
३ जीवनानुभवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी कविता शिकवून जाते. आजकाल आयुष्याचा आकृतिबंध मर्यादित झाला आहे. दीर्घकविता वाचायला, ऐकायला कोणाकडे वेळ नाही. मात्र, कवितेला मोजपट्टी कशी लावणार, हाही प्रश्न आहे, असे कवी हिमांशू कुलकर्णी यांनी सांगितले.