HSC / 12th Exam: निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका; सुप्रिया सुळेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:40 AM2023-02-21T11:40:19+5:302023-02-21T11:40:30+5:30
पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या
नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भिडपणे पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर ३५१ विध्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सौ.लीलावती रिखावलाल शहा कन्या शाळेत असलेल्या परीक्षा केंद्रावर विध्यर्थिनी परीक्षा देत आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, लक्ष्मणराव चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे, निवेदिता पासलकर त्याचबरोबर शिक्षक, होमगार्ड पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार
राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार असून ही आत्तापर्यंत ची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार
राज्यातील ३१९५ मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. मुलींची ६,६४,४६१ इतकी संख्या तर मुलांची संख्या ७ लाखांवर आहे. यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर भरारी पथक आणि बैठी पथक असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी १० मिनिट वाढवून देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्स चे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.