सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:15 PM2020-04-23T18:15:14+5:302020-04-23T18:15:47+5:30
धर्मराज कवी व कथाकार म्हणून आंबेडकरवादी साहित्य-विश्वात परिचित.
पुणे : सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व कथाकार धर्मराज निमसरकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. मागील एक वर्षापासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. निमसरकर यांच्या पार्थिवावर नातेवाईक व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विश्रांतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मराज कवी व कथाकार म्हणून आंबेडकरवादी साहित्य-विश्वात परिचित होते. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९४९ साली वणी परिसरातील राजूर (कॉलरी) या गावी झाला. कोळसा आणि चुन्याच्या खाणीत त्यांचे कुटुंब मजुरी करायचे. विपरित परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. नागपुरातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत इंजिनीयर म्हणून रुजू झाले. नागपुरातील सामाजिक आंदोलने आणि चळवळीने त्यांना लेखनाचे बळ दिले होते. नागपूरच्या मुक्तीवाहिनीच्या संस्थापनात त्यांचा सहभाग होता. १९७३ मध्ये भाभा आटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ते पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत रुजू झाले.
धर्मराज निमसरकर एक संवेदनशील कवी, कथा व कादबंरीकार व उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. 'अंतहीन' व 'उसवलेलं आकाश' या कथासंग्रहातून त्यांनी साहित्य विश्वात स्थान निर्माण केले. 'ठसठसणा-या जखमा', 'संकेतबंड', 'निळ्या पहाटेच्या सूर्यपूत्रांचे अधोरेखित' , 'वेदनास्पर्श' या कांदब-याना साहित्य चळवळीत मानाचे स्थान मिळाले. त्यांना अस्मितादर्श पुरस्कार आणिलोकानुकंपातर्फे कथा वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.