संत, लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:33 AM2022-09-27T08:33:52+5:302022-09-27T08:49:47+5:30

त्यांनी नुकतीच पुस्तक पन्नाशी साजरी केली होती...

writer Ramchandra Dekhne passes away Sant Vyasangi scholar of folklore | संत, लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

संत, लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

Next

पुणे : संत व लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, ललित लेखक, विचारवंत, अमोघ आणि रसाळ प्रासादिक वाणी असलेले कीर्तनकार, बहुरूपी भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचे सोमवारी (दि. २६) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी अंजली, मुलगा भावार्थ, मुलगी पद्मश्री, सून पूजा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी नुकतीच पुस्तक पन्नाशी साजरी केली होती.

महाराष्ट्रातील संतसाहित्य आणि लोककला साहित्य विश्वात त्यांचा लौकिक होता. सध्या ते पुण्यातील शनिवार पेठेतील डीएसके चिंतामणी या इमारतीत वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

लेखक परिचय

मूळचे शिरूर येथील कोरेगाव येथील वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातून बी.एस्सी पूर्ण केले. त्यानंतर एम.ए. पदवीला विद्यापीठात सुवर्णपदक मिळविले. त्यांनी पुणे विद्यापीठातून ‘संत एकनाथ महाराजांच्या भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ यावर पीएच.डी. संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. संत विचार प्रबोधिनी ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत. ललित, संशोधनात्मक तसेच चिंतनात्मक अशी त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे.

साहित्य विश्वातील योगदान...

विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. बहुरूपी भारुडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात, इतर प्रांतात तसेच अमेरिका, दुबई येथे सादर केले आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी झाले होते. अमेरिकेतील विश्वमराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका परिसंवादाचे अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या २४व्या विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य सभेच्या इंदूर येथील शंभराव्या संमेलनाचे, बडोदा येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या ६८व्या साहित्य संमेलनाचे, कडोली-बेळगाव येथील २१व्या मराठी साहित्य संमेलनाचे, १२व्या बंधुता साहित्य संमेलनाचे आणि विटा येथील २९व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्याशिवाय राळेगणसिद्धी येथे झालेल्या पहिल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या विश्व संतसाहित्य संमेलनात सहभाग घेतला होता. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित केलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.

मिळालेले पुरस्कार...

संत व लोकसाहित्यातील साहित्यिक योगदान, लेखन, संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य पुरस्काराने गौरविले. त्यामध्ये स्वामी विवेकानंद पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा कलाकार पुरस्कार, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारुडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

Web Title: writer Ramchandra Dekhne passes away Sant Vyasangi scholar of folklore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.