महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

By श्रीकिशन काळे | Published: October 7, 2024 01:03 PM2024-10-07T13:03:32+5:302024-10-07T13:04:13+5:30

आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली असून राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही

Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal | महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

महाराष्ट्राची सर्कस, कोणी विदुषकासारखे चाळे, तर कोणाच्या जाळ्यांवर उड्या, राजकारणावर राज यांचं परखड भाष्य

पुणे : ‘‘आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून भर घातली जाते. हा नेता काय बोलला आणि तो नेता काय बोलला ! यावरच ते प्रतिक्रिया घेतात. आज राजकारण्यांची भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. त्यांना बोलू शकतात, त्यामुळे साहित्यिकांनी आपला मराठी बाणा दाखवून राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे,’’ असे खडे बोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.

दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी झाले. याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संजय नहार, साहित्य महामंडळाचे प्रकाश पागे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, मी माझ्या आयुष्यातील सर्वात छोटे भाषण आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आम्ही काय बोलावे ? ज्यांचे आम्ही ऐकायचे त्यांना आम्ही काय बोलणार ! मसापच्या सभागृहातील साहित्यिकांचे फोटोच सर्व सांगत आहेत की, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा काय आहे. खरंतर मला कळत नाहीय की, माझी या ठिकाणी काय गरज असते. साहित्य वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, त्यासाठी आम्ही आहोतच, अन्यथा आम्हाला या साहित्य संमेलनामध्ये ऐकायला बोलवावे, बोलायला बोलवू नये ! पण काही वर्षांपासून मी साहित्यिक पाहत आलो आहे की, ज्यांच्यात मराठी बाणा होता. तो आता दिसत नाही. योग्य वेळी राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी त्यांच्यात होती, ती आज मला कमी दिसत आहे. आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ, महाराष्ट्राचे झालेले अध:पतन प्रचंड आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकासारखे चाळे करतेय, तर कोणी जाळ्यांवर उड्या मारतेय, खरंतर अशा राजकारण्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला सांगायला हवे !

राजकारण्यांचे कान धरून, त्यांना समजावून सांगण्याचे कर्तव्य साहित्यिकांचे आहे. तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकता, मग आम्ही बोललं तर ट्रोल केले जाते, असं म्हणाल, पण तुम्ही त्याचा विचार करू नका. मला पण ट्रोल केले जाते, मी ते पाहत नाही, वाचत नाही. आपण आपलं काम करावे.

महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. पण आज महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. राजकारण्यांना समजावणारे कोणी नाही, ज्यांना महाराष्ट्रातील बुजुर्ग म्हणावे, तेच त्यांच्या नादी लागलेले आहेत. म्हणून साहित्यिकांनी हे काम तुमच्यावर आहे आणि तुम्ही एक मोठी साहित्य चळवळ उभारायला हवी. ज्या प्रकारची भाषा राजकारणात येत आहे, ते पाहून आजची नवीन पिढी यालाच राजकारण समजत आहे. महाराष्ट्रात अध:पतन होण्याचे जे कारण आहे त्यात चॅनल प्रमुख आहेत. ते कोणी काहीही बोलले की, त्यांचे दाखवतात. त्यांनी ते थांबवले पाहिजे, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

Web Title: Writers hold the ear of politicians and make them understand Raj Thackeray appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.