आरमाराविषयीचे लेखन विखुरलेले
By admin | Published: March 30, 2017 02:45 AM2017-03-30T02:45:14+5:302017-03-30T02:45:14+5:30
आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे.
पुणे : आजवरचा इतिहास केवळ जमिनीवरील लढायांवर केंद्रित झाला आहे. समुद्रातील लढायांकडे दुर्लक्ष झाले आहे. आरमार धोरण या दृष्टिकोनातून इतिहासाचे विश्लेषण झालेले नाही. मराठ्यांच्या आरमाराविषयीचे लेखन विखुरलेल्या स्वरूपात आहे, असे मत मुंबईतील इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सचिन पेंडसे यांच्या ‘मराठा आरमार : एक अनोखे पर्व’ या पुस्तकास शं. ना. जोशी पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, परीक्षक डॉ. सदाशिव शिवदे, गणेश राऊत आदी उपस्थित होते.
पेंडसे म्हणाले, ‘‘केवळ पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर माहिती आणि फोटो पाहून इतिहासाचा आणि किल्लयांचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास आवश्यक असतो. तसेच, या अभ्यासाचा आजच्या परिस्थितीशी संबंध जोडता यायला हवा. भारताचा नाविक इतिहास खूप प्राचीन आहे. त्याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.’’
पाठक यांनी आरमार इतिहासाचा मागोवा घेतला. ते म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांच्या नौदल आरमाराचे महत्त्व बंगालच्या इतिहासकारांनी समजावून सांगितले. सागरी आक्रमण करून पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांना अडवणारी कोणतीही समर्थ शक्ती अस्तित्वात नव्हती. या आक्रमकांना सत्तेच्या पलीकडे जाऊन धर्मप्रचाराचे काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी नागरिकांवर अन्याय, अत्याचार केले. भारतीय इतिहास जागतिक नौकायुद्धाला प्रेरणा देणारा आहे.’’
शिवदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजीमहाराज, कान्होजी आंग्रे आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी सागरी आरमाराचे महत्त्व जाणले होते. ते महत्त्व पेंडसे यांनी अधोरेखित केले. मराठ्यांचे आरमार कसे बुडाले, हे त्यांनी लेखनातून निर्भीडपणे मांडले आहे. इतिहास अभ्यासकाला निर्भीडपणे निष्कर्ष नोंदवावे लागतात. ते त्यांने निर्भयतेने नोंदवावेत.’’ प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.