आंबेडकरी विचारातून लेखन करणार
By admin | Published: January 11, 2017 02:42 AM2017-01-11T02:42:25+5:302017-01-11T02:42:25+5:30
डॉ. न. म. जोशी हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अत्यंत सुपरिचित असे नाव. ‘नि:स्पृह’, ‘कथानम’, ‘मोहनदास करमचंद’, ‘चरित्रकथा’ अशा दर्जेदार
नम्रता फडणीस / पुणे
डॉ. न. म. जोशी हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अत्यंत सुपरिचित असे नाव. ‘नि:स्पृह’, ‘कथानम’, ‘मोहनदास करमचंद’, ‘चरित्रकथा’ अशा दर्जेदार लेखनातून वाचकांसमोर विविधांगी विषयांची वैचारिक दालन त्यांनी खुली केली. आज (दि.११) ते ८१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
* शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासाविषयी काय वाटते?
- साहित्य व शिक्षण प्रवाह माझ्या दृष्टीने वेगळे नाहीत. साहित्याला शिक्षणातून सामुग्री मिळते आणि साहित्याचा फुलोरा हा शिक्षणातून निर्माण होतो. या दोन्ही क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळाल्याने मी खूप समाधानी आहे.
* सध्याच्या सामाजिक परिस्थितीकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहाता?
- स्वातंत्र्यचळवळीचा मी साक्षीदार ठरलो. त्यावेळी स्वराज्य मिळविण्यासाठी जो काम करेल तो देशभक्त, अशी देशभक्तीची एक साधी सोपी व्याख्या होती. पण आता सुराज्यासाठी जो काम करेल तो देशभक्त असा या शब्दाचा अर्थ आहे. स्व पासून आपण पर्यंत हा प्रवास झाला पाहिजे. राष्ट्रीय उन्नतीसाठी सामाजिक विचार निर्मितीमधून प्रकाशाची बेट वाढली तर समाजात माजलेला अहंकार दूर होईल.
* समाज परिवर्तन कसे होऊ शकते?
- साहित्य, समाज आणि शिक्षण मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि पाहात आहे. ज्यांच्या हातात प्रशासनाची सूत्रे आहेत अशा प्रशासकांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत कुणालाच देश चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी चारित्र्य संवर्धन प्रबोधिनी स्थापन झाली पाहिजे.
* डॉ. आंबेडकर यांच्यावर एखादा ग्रंथ लिहिण्याचा काही मानस?
- हो नक्कीच. आंबेडकरांची चरित्रे पुष्कळ लोकांनी लिहिली. परंतु आंबेडकरांचा विचार निळ्या क्रांतीच्या विचारातून पाहिला गेला. मात्र त्यांच्या विचारामध्ये भगवा त्यागाचा, पांढरा शांतीचा आणि हिरवा सृजनाचाही विचार आढळतो. राष्ट्रध्वजातील रंगांचे प्रतिक आंबेडकरांच्या विचारांमध्ये पाहायला मिळते. आंबेडकरांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्षित करा असा मंत्र दिला. शिक्षण हा त्याचा पाया होता. याच विचारांवर आंबेडकरांचे चरित्र लिहिणार आहे.
* यापुढचा तुमचा प्रवास कसा असेल?
- डॉ. आंबेडकर यांच्या दोन खंडांची मी भाषांतरे केली. आंबेडकरांच्या समग्र अभ्यासामुळे त्यांचे विचार नसानसात भिनले आहेत.
वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षणात सुरू झालेला प्रवास ७५ वर्षे अखंडपणे सुरू राहिला. आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवावर ‘शेवटचा तास’ हे ललित लेखन करण्याचाही विचार आहे.
* डॉ. आंबेडकर यांच्यावर तुम्ही लेखन केले आहे त्याविषयी ?
- १९८५ साली मी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात्मक ग्रंथाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या दोन खंडांची मी भाषांतरे केली. मुंबई विद्यापीठातल्या अॅना फर्नांडिस हिने माझ्या मार्गदर्शनाखाली आंंबेडकरांवर पीएचडी केली आहे. आंबेडकरांच्या समग्र अभ्यासामुळे त्यांचे विचार नसानसात भिनले आहेत.