Purushottam Karandak: एकांकिकेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय महत्वाचे; मात्र पुण्यातील तरुणाईचा तांत्रिक गोष्टींवरच भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:46 AM2023-07-19T10:46:16+5:302023-07-19T10:46:35+5:30
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पूर्वीसारख्या एकांकिका आता येत नसल्याची आयोजकांची खंत
श्रीकिशन काळे
पुणे : पुरुषोत्तम करंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये लगबग सुरू होत आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या आयोजकांनी मात्र एकांकिकांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पूर्वीसारख्या एकांकिका आता येत नाहीत. विद्यार्थी अभ्यास करून तालमी करीत नाहीत. त्यामुळे त्या गुणवत्तेच्या एकांकिका येत नसल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये एकांकिकेचा आशय, विषय, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या बाबींवर सर्वोच्च महत्त्व दिले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील तरुणाई यावर अधिक भर न देता तांत्रिक गोष्टींवर देत आहे. त्यामुळे चांगल्या, दमदार एकांकिका सादर होत नाहीत आणि परिणामी पुण्याबाहेरील एकांकिकांना पारितोषिके मिळत आहेत. करंडकही काही वर्षांपासून बाहेरील मुले पटकावत आहेत. शहरातील मुले पुरेसे कष्ट करत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याची चिंता आयोजकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थी लेखक आता घडत नाहीत, हीदेखील खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र कलोपासक संस्थेच्या प्रारंभापासून राजाभाऊ नातू, मधु जोशी, प्रमिलाताई बेडेकर आणि त्यांच्यानंतरही संस्थेच्या सदस्यांनी स्पर्धेचे नेटके आयोजन आणि काटेकोर नियोजन केले आहे. या स्पर्धेतून मराठी नाट्य - चित्रपटसृष्टीला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते मिळाले आहेत. अनेक कलाकारांची कारकीर्द पुरुषोत्तमच्या रंगमंचापासून सुरू झाली आहे.
संस्थेची स्थापना कशी झाली ?
- महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची स्थापना पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी केली. या शाळेतील शिक्षक संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फरसबंद पारावर बसून, नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे. पुण्यातील सार्वकालिक विद्वान गृहस्थ आणि इतिहासकार महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा पाराजवळून जाता जाता शिक्षकांच्या गप्पा ऐकल्या.
- दत्तो वामन पोतदार म्हणाले, ‘दुसऱ्यांच्या नाटकांवर एवढी टीका करण्यापेक्षा तुम्हीच एखादे निर्दोष नाटक बसवून आणि करून का दाखवत नाही?’ त्या शिक्षकांनी ही सूचना खरोखरच मनावर घेतली आणि ३ ऑगस्ट १९३६ रोजी महाराष्ट्रीय कलोपासक ही हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्था सुरू केली. दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
- सुरुवातीच्या काळात संस्थेने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धा सुरू केली. शिवाय, काही नव्या - जुन्या नाटकांचे प्रयोग रंगमंचावर सादर करण्यास आरंभ केला. पुढे महाराष्ट्र सरकारने आंतरशालेय नाट्य स्पर्धा चालू केल्यानंतर ‘महाराष्ट्रीय कलोपासक‘ने ही नाट्यवाचन स्पर्धा बंद केली.
- महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे (पु. रा. वझे) यांचे एक ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ १९६३पासून संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चालू केल्या आणि त्या स्पर्धांमधून विजयी होणाऱ्या संघाच्या कॉलेजला पुरस्कार म्हणून, पुरुषोत्तम करंडक देण्यास सुरुवात केली.