लेखणीचा प्रकाश मंदावला : कुलकर्णी
By admin | Published: March 27, 2017 03:22 AM2017-03-27T03:22:30+5:302017-03-27T03:22:30+5:30
ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे
पुणे : ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे. प्रभावशाली संपादकांच्या दुसऱ्या फळीमध्ये तळवलकर अग्रस्थानी होते. लेखणी गाजवणारा हा महान संपादक वाचनवीर होता. त्यांच्या जाण्याने लेखणीचा प्रकाश मंदावल्याची भावना ज्येष्ठ संपादक एस. के. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने तळवलकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साखरीकर, जयराम देसाई, पराग करंदीकर, डॉ. अरुण खोरे, संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, ‘तळवलकरांचा यशवंतराव चव्हाणांशी विशेष स्नेह होता. राजीव गांधी यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये तळवलकरांचाही समावेश होता. संपादकाला संपादकाने कसे वागवले पाहिजे, याचे ते स्वत: एक उत्तम उदाहरण होते.’
तर, पवार यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण रिव्हीएराला राहत असताना शरद पवार व मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते आतमध्ये एका पत्रकाराशी बोलत असल्याचे समजले. बऱ्याच वेळाने ते पत्रकाराला सोडायला बाहेर आले. तेव्हा त्यांनी शरद पवारांची ओळख तळवलकरांशी करून दिली. शरद पवारांनी त्यांना जाणीवपूर्वक तळवलकरांच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. तळवलकर अत्यंत स्पष्टवक्ते होते. पत्रकारिता, व्यासंग आणि लिखाण हे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. उत्तम समीक्षा, रसग्रहण करीत त्यांनी जगभरातील विचारवंत आणि लेखक मराठी वाचकांपर्यंत पोचवले.’
या वेळी करंदीकर, डॉ. खोरे, साखरीकर यांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. बढे यांनी प्रास्ताविक केले तर देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी तळवलकरांना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)