पोलीस शिपाई पदाची येत्या ५ ऑक्टोबरला लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:53+5:302021-09-18T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१४ पोलीस शिपाई या पदासाठी (सन २०१९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१४ पोलीस शिपाई या पदासाठी (सन २०१९ ची भरती) यंदा मैदानी चाचणी अगोदर लेखी परीक्षा होणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरला पुणे शहर आणि परिसरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३९ हजार ३२३ जणांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
पुणे शहर पोलीस दलातील सन २०१९ च्या रिक्त २१४ पदांकरिता परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते.
पोलीस शिपाई पदांसाठीच्या भरती परीक्षेसाठी परीक्षार्थींना त्यांचे प्रवेशपत्र येत्या २२ सप्टेंबरपासून त्यांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर http://mahapolicerc.mahaitexam.in या पोर्टलवरून देखील उमेदवारांना डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
अमिताभ गुप्ता म्हणाले, की यापूर्वी लेखी परीक्षेचा टप्पा हा पोलीस दलामार्फत घेण्यात येत होता. परंतु, यंदा प्रथम खासगी यंत्रणेकडून लेखी परीक्षेचा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. जीए साॅफ्टवेअर टेक्नॉलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ही प्रक्रिया होणार आहे.
-----
सन २०२०-२१ ची भरती लगेच सुरू करणार
शहर पोलीस दलातील सन २०२० ची देखील भरती यानंतर लगेच सुरू करण्यात येणार आहे. सन २०२० ला २२३ जागा रिक्त आहेत. त्याची प्रक्रियाही आम्ही तातडीने सुरू करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वेळी सांगितले.