चूक चालकाची, शिक्षा मुलांना
By admin | Published: March 30, 2016 02:11 AM2016-03-30T02:11:43+5:302016-03-30T02:11:43+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसचालकाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला. मोरवाडी चौकात एका स्कूल बसच्या चालकाने सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसचालकाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला. मोरवाडी चौकात एका स्कूल बसच्या चालकाने सिग्नल तोडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यास वाहतूक पोलिसाने हटकले. दंड भरण्यास सांगितले, मात्र दंडाची रक्कम भरण्याऐवजी चालकाने हुज्जत घालण्यात वेळ घालवला. वार्षिक परीक्षेचा पेपर काही मिनिटांनी सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, बसमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १० मिनिटे उशीर झाला. त्यांना ऐन परीक्षेच्या वेळेत मनस्ताप सहन करावा लागला.
शहरात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षेचा काळ सुरू आहे. एस.एन.बी.पी. स्कूलच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवरील चालकाने मोरवाडी चौकात सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केला. गुलाब अलमली या वाहनचालकाला चौकात थांबलेल्या आर. एल. सोनावणे या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अडविले. त्याच्याकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. वाहनचालकाकडे परवान्याची मूळ प्रत नव्हती. त्याने परवान्याची छायांकित प्रत वाहतूक पोलिसांना दाखविली. मूळ परवाना नाही, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला दंड भरण्यास सांगितला. परंतु, ‘‘माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुम्हाला काही वेळानंतर या ठिकाणी पैसे आणून देतो,’’ अशी विनंती वाहनचालकाने केली. त्यावर वाहतूक पोलिसाने ‘‘ नियम कळत नाहीत का? एक तर मूळ परवाना नाही. खिशात दंड भरण्यास आवश्यक तेवढे पैसेही नाहीत. वाहतूक नियमाचे उलंघन करून वाहन चालवत आहेस.’’
चौकातच साडेअकरा
वाजले होते. विद्यार्थ्यांमुळे वाहनचालकाला दंड न भरता पुढे जाण्याची मुभा दिली. (प्रतिनिधी)
‘‘बसमध्ये विद्यार्थी आहेत. तुझ्या चुकीमुळे अपघाताची दुर्घटना घडू शकते. पालक तुमच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवतात. तुमच्या चुकांचा फटका त्यांना बसतो. परीक्षा सुरू असल्याच्या काळात तरी योग्य ती काळजी घेणे अपेक्षित आहे,’’ अशी त्याची कानउघडणी पोलिसांनी केली. बसमध्ये वाहनचालकाचा एक सहकारी व एक मावशी होती. वाहनचालकाने त्यांनाही पैशाची विचारपूस केली. मात्र १०० रुपये दंड भरण्याइतकी रक्कम कोणाकडेच नव्हती. यामुळे दोघांनी एकमेकांबरोबर हुज्जत घातली. ११ वाजून २० मिनिटांनी वाहतूक पोलिसाने त्या बसचालकाला पकडले होते. त्यांचा वाद सुमारे १० मिनिटे सुरू होता. बसमधील सुमारे २५ विद्यार्थ्यांना साडेअकरा वाजता परीक्षेचा पेपर देण्यास जायचे होते.