मतदार यादीबाबत व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला चुकीचा संदेश, हडपसरमध्ये एकावर कारवाई
By नितीन चौधरी | Published: May 10, 2024 06:34 PM2024-05-10T18:34:45+5:302024-05-10T18:35:31+5:30
दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, प्रशासनाचे आवाहन
पुणे : मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्सअपद्वारे पसरविल्याने जिल्हा प्रशासनाने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदेशामुळे हडपसर येथील मतदार नोंदणी कार्यालयात नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी झाली होती. अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त मोहिमेंतर्गत मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीबाबत सर्व विधानसभा मतदार संघात गेली वर्षभर काम करण्यात आले असून त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मतदाराचे नाव वगळताना नियमानुसार सर्व कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे प्रसारित केलेली माहिती अत्यंत चुकीची आहे, असे स्पष्ट करुन संबंधित व्यक्तीला याबाबत २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश संबंधित व्यक्तीला जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत. खुलासा प्राप्त न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव नसेल संबंधितास मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्यास मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ पुराव्यापैकी एक दाखवून मतदान करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. असे चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आली आहे.