एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:23 PM2022-04-08T19:23:32+5:302022-04-08T19:37:46+5:30
आज करण्यात आलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दात नाराजी
पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. सर्वांबरोबर आम्हीही त्यांच्या बाजूने आहोत. मात्र, सध्या ज्या पद्धतीने कर्मचारी आंदोलन करत आहेत. ते चुकीचे आणि अशोभनीय असे आंदोलन आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडून आज करण्यात आलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दात भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील घराबाहेर आंदोलन केले. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे घोषणाबाजी करून गोंधळ घातला.
याबाबत संभाजीराजे यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना कायदा हातात कोणीही घेऊ नये. एसटी कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ते अशोभनीय आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या बाजूने आहोत. मात्र, अशा पद्धतीने आंदोलन अशोभनीय आहे.