‘बेदरकार ’वाहनचालकांवर गुन्ह्यांची ‘मात्रा’ ; तब्बल ९० गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:09 PM2018-12-19T17:09:53+5:302018-12-19T17:16:08+5:30
पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात.
पुणे : एकीकडे शहरात वाहनचालकांमध्ये वेगाची नशा वाढत चाललेली असतानाच या बेदरकार वृत्तीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्यांची मात्रा वापरण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलिसांनी चार महिन्यांमध्ये भादवि कलम २७९ आणि २८३ नुसार केलेल्या कारवायांमध्ये तब्बल ९० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे.
पुणे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वेडीवाकडी वळणे घेत सुसाट जाणारे वाहनचालक पाहायला मिळतात. उरात धडकी भरविणारा त्यांचा वेग पाहून सर्वसामान्यांना अक्षरश: धस्स होते. यासोबतच रस्त्यावर कुठेही वाहन उभे करण्याचे प्रकारही सर्रास सुरु आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढते. या वाहनचालकांवर कारवाई करण्यामध्ये मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. स्थानिक पोलिसांनाही याप्रकारे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आहेत. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.
पुणे महापालिकेच्या मैला वाहून नेणाऱ्या वाहनावर दत्तवाडी पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. नो एंट्रीमधून बेदरकारपणे गाडी चालवत अन्य लोकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी सज्जन विजय खाडे (रा. म्हसवड, ता. माण, सातारा) याच्याविरुद्ध कलम २७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या चार तासात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये न्यायालयाने खाडेला १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली होती. ही घटना १७ सप्टेंबरला घडली होती.
अशा प्रकारे आतापर्यंत दत्तवाडी पोलिसांनी विविध रस्त्यांवर कारवाई करीत ८० गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७५ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाने प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. या वाहनचालकांना एकूण ९० हजारांचा दंड झालेला आहे.
====
भादवि कलम २८३ प्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन पार्क केलेल्या सात वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने या वाहनचालकांनाही प्रत्येकी १२०० रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावलेली आहे. या सर्वांना ८ हजार ४०० रुपयांचा दंड झाला आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे ९१ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३३ हजार ७०२ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
===
वाहनचालकांनी बेदरकारपणे तसेच ओव्हरस्पीडने वाहन चालवू नये. नो एंट्री आणि विरुद्ध बाजुने येणे टाळावे. रस्त्यावरुन ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर महिला, लहान मुले जात असतात. तसेच अन्य वाहनचालकांनाही तुमच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागू शकतो, किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे स्वत:सोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. गुन्हा दाखल झाल्यास पुढे सर्वच गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात. घाई न करता वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांची संख्या कमी होईल आणि वाहतूकीला शिस्तही लागेल.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे.
.............
कलम २७९
मानवी जिवितास धोका, दुखापत, नुकसान होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे. या गुन्ह्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. दोषी वाहनचालकास सहा महिन्यांपर्यंतची कैद, आर्थिक दंड अथवा दोन्ही अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकते.
....................
कलम २८३
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाहन उभे करुन वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, अन्य प्रवाशांना धोका निर्माण करणे या कारणासाठी आर्थिक दंडाची तरतूद असून न्यायालयाद्वारे शिक्षाही होऊ शकते.