वरुडेकरांची होतेय पाण्यासाठी पायपीट
By admin | Published: May 3, 2015 05:51 AM2015-05-03T05:51:51+5:302015-05-03T05:51:51+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी वरूडे येथील जनतेला आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.
वाफगाव : पिण्याच्या पाण्यासाठी वरूडे येथील जनतेला आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या तरी प्रशासनाकडून पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथे अतिशय जुन्या काळातील एक हातपंप आहे. त्यावरच सध्या येथील बहुतेक लोक अवलंबून आहेत.
हातपंपाला देखील अतिशय कमी पाणी उपलब्ध आहे. एक हंडा भरण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो, अशी माहिती येथील रहिवासी देत आहेत. या गावाची लोकसंख्या जवळपास २०००च्या घरात आहे. त्यामुळे येथे दररोज कमीतकमी २ टँकरची आवश्यकता आहे. मग कुठे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा फार मार्गी लागेल. परंतु, गेल्या एक महिन्यापासून टँकरची मागणी करूनदेखील येथे पाणी उपलब्ध झाले नाही. बहुतेक नागरिक गाव सोडून पाहुण्यांकडे राहण्यासाठी जाऊ लागले आहेत. पिण्याच्याच पाण्याची अवस्था अतिशय बिकट आहे तर वापरण्याचे पाणी मिळविणे अतिशय कठीण झाले आहे. रात्री-अपरात्रीच हातपंपावर नंबर लागलेले असतात. कधीकधी पाण्यासाठी भांडणेदेखील होतात.
जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश घ्यावा लागतो व नंतरच पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आल्याशिवाय ग्रामीण भागातील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला पाणी मिळणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.
(वार्ताहर)