कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटच्या संसर्गाचा वेग १० टक्क्यांनी जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:26 PM2022-04-18T13:26:20+5:302022-04-18T13:27:35+5:30
एक्सई व्हेरियंट हा पूर्वीच्या बीए १ पेक्षा १० टक्के अधिक वेगाने वाढतो...
पुणे : ब्रिटनमध्ये जानेवारी २०२२ मध्ये सापडलेल्या एक्सई व्हेरियंटचे (COVID-19 variant XE) काही रुग्ण भारतामध्ये सापडण्यास सुरुवात झाली आहे. एक्सई व्हेरियंट हा ओमिक्रोनचा (omicron) उपप्रकार असलेले बीए १ आणि बीए २ यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार एक्सई व्हेरियंट हा पूर्वीच्या बीए १ पेक्षा १० टक्के अधिक वेगाने वाढतो, तर त्याच्या संसर्गाची तीव्रता आणि त्यामुळे रुग्णांवर होणार परिणाम सध्या अभ्यासला जात आहे.
जगभरात दिल्या गेलेल्या लसी अजूनही प्रभावी असून, या एक्सई व्हेरियंटमुळे त्यांचा प्रभाव कमी होईल, अशी सध्या तरी शक्यता नाही. भारतामध्ये हा व्हेरियंट वेगाने पसरला तरी मृत्यूदर हा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूप कमी राहील. सध्या तरी नवीन निर्बंध लादण्याची गरज नसून येत्या काही दिवसात ब्रिटन आणि अमेरिकेमधून जी माहिती समोर येईल त्याच्या निष्कर्षावरून पुढची उपाययोजना ठरवता येईल. सध्या ब्रिटनमध्ये हा व्हेरियंट प्रबळ असला तरी तिथेसुद्धा नवीन निर्बंध लादले नाहीत. पुढील दोन आठवड्यात एक्सई व्हेरियंटचे स्पष्ट चित्र समोर येईल, तोपर्यंत मास्कचा वापर लोकांनी करावा, असे आवाहन ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी केले आहे.
एखाद्या रुग्णाला विषाणूच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंटचा संसर्ग होतो, तेव्हा रुग्णाच्या शरीरात दोन्ही व्हेरियंटच्या जनुकांचेसुद्धा एकत्रीकरण होते आणि त्यातून नवीन व्हेरियंट तयार होतो, त्याला रिकॉम्बिनंट व्हेरियंट म्हणतात. ब्रिटन सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, सध्या ब्रिटनमध्ये एक्सई व्हेरियंटचे ६०० हून अधिक रुग्ण आहेत. एक्सई व्हेरियंट रिकॉम्बिनंट प्रकारातील व्हेरियंट आहे (पुनर्संयोजन) आणि विषाणूचे असे उपप्रकार तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन.
राज्यातून कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. मास्क वापरण्याचा नियम शिथिल करण्यात आला आहे. कोरोनाच्या चाचण्यांची अनेक केंद्रे बंद करण्यात आली आहेत. लंडनमध्ये फ्री टेस्टिंग बंद करण्यात आल्यावर १५-२० दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा चढत असल्याचे पहायला मिळाले. आपल्याकडे व्यवहार पूर्ववत झाले आहेत, शाळा सुुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा नव्याने उद्रेक होऊ नये, यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. बहुतांश नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ४ ते ६ महिन्यांनी प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांनी वेगाने बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ.