यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 02:25 PM2024-03-05T14:25:56+5:302024-03-05T14:26:18+5:30
यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू
लोणी काळभोर: यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू झाले आहेत
निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तसेच हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या आरोपांना खुलासा देऊन माधव काळभोर व प्रकाश मस्के यांनी सोमवारी (दि.४)पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी बोलताना प्रकाश मस्के म्हणाले की, प्रकाश जगताप यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्याअगोदर स्वतःच्या विविध कार्यकारी सोसायट्यांची थकबाकी प्रथम भरावी अशी टीका त्यांनी केली. सिटीझन बँक बुडवली म्हणाऱ्यांनी ती कशी बुडाली याची माहिती घ्यावी.त्यावेळी प्रताप गायकवाड यांनी त्यांचे जवळच्या मित्राला बँकेतून १० लाख रुपये कर्ज देण्याची विनंती केली होती त्यावेळी बँकेने त्वरित कर्ज मंजूर करून दिले होते परंतु त्या कर्जदाराने कर्ज फेडले नसल्याने बँकेला नुकसान झाले होते. मांजरी येथील उपबाजार समितीची ५ एकर जमीन स्वतः प्रयन्त करून बिल्डरच्या घशातून बाहेर काढली त्या जमिनीवर बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर हे मच्छी बाजार सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजे हे लोक शेतकरी बाजारास व्यापारी बाजार बनवत आहेत तेथील वाहनतळ कोणाकडे आहे याप्रकारेच बऱ्याच गोष्टी आम्हाला माहित आहेत त्या आम्ही बाहेर काढू असा इशारा प्रकाश मस्के यांनी दिला.
यावेळी बोलताना माधव काळभोर म्हणाले की, हवेली तालुका खरेदी विक्री संघावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची १ कोटी २० लाख रुपये कर्ज देणी थकबाकी असल्याने खरेदी विक्री संघाच्या मालकीचे प्लॉट हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहभागीदारी म्हणून विकसित झाला आहे. ते कोणा मर्जीतील बिल्डरला लागेबांधे म्हणून विक्री झाले नाही. तेंव्हा बँकेचा तत्कालीन सहपालकत्व सांभाळणारे गोपाळ म्हस्के हे तुमच्या पॅनेलचे प्रचारक आहेत, या प्लॉट बाबतची कार्यवाही झाली तेंव्हा खरेदी संघावर संचालक कोण होते, त्यावेळी आपण कोणाची कारकूनी करत होता. त्यावेळी आपले नेते कोण होते, आपण बाजार समितीचे सभापती झाल्यानंतर आपला अर्थिक उत्कर्ष कसा झाला हे पाहणारा संपूर्ण हवेली तालुका व संपूर्ण जिल्हा असल्याने विरोधकांचे आरोप म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज को' म्हणण्याची वेळ आली असून प्रत्येक वेळी नवा नेता शोधून राजकीय दुकान चालविणाऱ्यांनी फार म्हणणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारु नये अशी शेलकी टिका प्रकाश जगताप यांचे नाव घेऊन माधवअण्णा काळभोर यांनी केली आहे.
चुकीच्या कारभारामुळे कारखाना बंद : जगताप
या आरोपांना प्रतिउत्तर देताना प्रकाश जगताप म्हणाले की, संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे मागील तेरा वर्षापासून बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरु करत हवेली व दौंड शेतकऱ्यांना तालुक्यातील पुनरुज्जीवीत करण्याचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा खरा प्रयत्न राहणार आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्या बाजुने सर्वोतोपरी प्रयत्न केले.
मात्र, विरोधकांनी जिरवाजिरवीचे राजकारण केल्याने ही निवडणुक लागली आहे. कारखाना कोणी बंद पाडला, याची जाणीव सभासदांना असल्याने या निवडणुकीत मतदार अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला विजयी करतील, असा विश्वास हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी व्यक्त केला.