‘यशवंत’ दीर्घकाळ चालवणार

By Admin | Published: April 22, 2017 03:38 AM2017-04-22T03:38:54+5:302017-04-22T03:38:54+5:30

येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. तीमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील दीर्घ मुदतीसाठी कारखाना

'Yashwant' will run for a long time | ‘यशवंत’ दीर्घकाळ चालवणार

‘यशवंत’ दीर्घकाळ चालवणार

googlenewsNext

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. तीमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील दीर्घ मुदतीसाठी कारखाना चालवायला द्यायचा ठराव मंजूर झाल्याचा दावा प्रशासकीय संचालक मंडळाने केला, तर सत्ताधारी पक्षाने लोकशाहीचा गळा घोटला असून कुठलाही ठराव मंजूर झाला नाही, असा दावा विरोधकांनी केला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखाना (थेऊर)ची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी तब्बल ५ वर्षांनी कारखाना कार्यक्षेत्रावर प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष पी. आर. घोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, प्रशासकीय संचालक मंडळ, माजी संचालक सुभाष काळभोर, सुरेश घुले, रोहिदास उंदरे, प्रताप बोरकर, सुभाष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, राजेंद्र खांदवे, अप्पासाहेब काळभोर, सुदर्शन चौधरी, शिवदास काळभोर, युगंधर काळभोर, सागर चौधरी, अण्णासाहेब काळभोर, प्रशांत काळभोर, सुभाष काळभोर, दिलीप घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पी. आर. घोडके यांनी विस्तृत प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्वांचे मिळून ७४ कोटी ६७ लाख रुपये कर्ज आहे. शासनाचे देणे साडेसात कोटी रुपये, सभासद देणी साडेपंचवीस कोटी रुपये, कामगार देणी २९ कोटी रुपये व इतर देणी २६ कोटी रुपये, असे एकूण १६३ कोटी रुपये कर्ज आहे. कारखान्याला अग्रीम उचल, ठेवी व शासनाकडून मिळणारी सबसिडी असे एकूण २१ कोटी रुपये येणे आहे. कारखाना ६ वर्षे बंद असल्याने व्याज, कामगार पगार आदी ३२ कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे. कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम एक कोटी २९ लाख रुपये जमा न केल्याने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याची संपूर्ण चल व अचल मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे जमीन विक्रीला अडचणी येत आहेत. तरी, सभासदांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन घोडके यांनी केले.’’
त्यानंतर कार्यकारी संचालक साहेबराव खामकर यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील ठराव मंजुरीसाठी मांडले. या वेळी विकास लवांडे यांनी सभासदांच्या आलेल्या लेखी सूचना वाचण्याची विनंती केली. या सूचना अर्जावर सह्या कुणाकुणाच्या आहेत व सह्या केलेले कारखान्याचे सभासद आहेत का, अशी विचारणा या वेळी सागर चौधरी, सुदर्शन चौधरी यांनी केली. व्यासपीठावर बसलेले किती संचालक कारखान्याचे उत्पादक सभासद आहेत, अशी विचारणा सुरेश घुले यांनी केली. या वेळी प्रशासकीय संचालक मंडळ शासनाने कायद्यानुसार नियुक्त केले आहे. तसेच, विकास लवांडे यांनी केलेला अर्ज निकाली काढण्यात आला आहे, अशी माहिती घोडके यांनी दिली.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग काळे या वेळी म्हणाले, ‘‘यशवंत कारखाना हा २० हजार सभासद शेतकरी यांच्या चुलीशी निगडित असलेला प्रश्न आहे. त्यामुळे राजकारण न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सर्वांनी थोडेथोडे पैसे जमवले, तर कारखाना नक्की चालू होईल.‘‘ या वेळी ठराव मंजूर करताना गुप्त मतदान घ्यावे, अशी मागणी साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले म्हणाले, ‘‘जमीन न विकता कारखाना दीर्घ मुदतीसाठी चालविण्यास द्यावा. दीर्घ मुदतीवर कारखाना चालवायला दिल्यावर दीडशे कोटी रुपये कोण गुंतवणार आहे, अशी विचारणा विकास लवांडे यांनी केली.
दरम्यान, गोंधळाला सुरुवात झाल्यावर अध्यक्ष घोडके यांनी ठराव मंजूर झाल्याचे घोषित करून राष्ट्रगीत घेण्याचे जाहीर केले. या वेळी परत गोंधळ सुरू झाला. संचालक केशव कामठे यांनी वंदेमातरम् म्हणण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. त्यामुळे वंदेमातरम् बंद झाले. या वेळी राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संचालिका पूनम चौधरी यांनी केली. दरम्यान, गोंधळातच ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करून जन गण मन घेऊन सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. (वार्ताहर)

- सभा संपल्यावर संचालक मंडळाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. या पत्रकात कारखाना दीर्घ मुदतीसाठी कराराने भागीदारी सहयोगी तत्त्वावर सहकारी अथवा खासगी संस्थेला चालवण्यास देण्याचा ठराव मंजूर झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे तसेच अतिरिक्त जमीनविक्री करून त्यामधून निधी उपलब्ध करून कारखाना चालू करायचा, हे दोन्ही ठराव नामंजूर झाल्याचे संचालक मंडळाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

- सभा संपल्यावर एका ऊसउत्पादक शेतकऱ्याने झालेल्या गोंधळावर खूप बोलकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘या सर्व गोंधळ करणाऱ्यांचे गुरुजी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना काय बोलायचे ते शिकवून पाठवतात. मग विद्यार्थी येथे आल्यावर गरज पडल्यास गोंधळ घालून गरज नाही पडली, तर गोंधळ न घालता आपापला ‘पक्षीय अजेंडा’ पुढे रेटण्याचे काम करतात.’’

आजच्या सभेत भाजपाच्या लोकांनी सभासदांचे काहीही म्हणणे न ऐकता सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. एकही विषय मंजूर नसताना जबरदस्तीने प्रशासक कोणत्याही चर्चेविना ‘मंजूर-मंजूर’ म्हणत होते. सभासदांच्या हिताचा विचार न करता भाजपाहिताचे प्रशासक व भाजपाचे ठराविक २-४ जण बोलत होते. सभेत कुठलाही निर्णय झाला नाही. भाजपा हुकूमशाही राबवत आहे. त्यांना खरेच कारखाना सुरू करायचा असेल, तर सभासदांना विश्वासात घ्यावे. - विकास लवांडे,
प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस.

राज्य सरकारमधील एका सहकार सम्राटमंत्र्याला कारखाना चालविण्यास घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आजची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती.- सुरेश घुले, माजी संचालक

Web Title: 'Yashwant' will run for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.