यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. संजीव सोनवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 11:46 PM2023-05-19T23:46:51+5:302023-05-19T23:48:41+5:30
राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ते कुलगुरूपदी कार्यरत राहतील. राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. १९) रोजी हे आदेश दिले. डॉ. सोनवणे हे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू तसेच डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड एक्सटेशन विभागप्रमुख कार्यरत होते. त्यांनी कम्युनिकेशन आणि गणित या विषयात एमएस्सी, डिस्टन्स एज्युकेशन विषयात एमए तसेच एमपी.एड आणि पीएचडी केलेली आहे.
अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (२०१९), माइंड ट्री हेलन केलर अवार्ड (२०१६) आणि पुणे महापालिकेचा बेस्ट टीचर्स पुरस्कार (२०१३) मिळालेला आहे. सोनवणे यांनी विविध परिषदेत सहभागी होत ६ आंतरराष्ट्रीय तसेच २३ राष्ट्रीय शोधनिबंध सादर केले. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विविध विषयावर १५ पुस्तकाचे लेखन केलेले आहे. तसेच २३ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता.
विद्यापीठामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख आणि दर्जेदार कसे होतील यावर अधिक भर देण्यात येईल. विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. -प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ