'प्रति जेजुरी' निमगाव खरपुडी येथील खंडोबा यात्रा रद्द ; कोरोनामुळे ग्रामस्थांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:49 PM2021-02-23T15:49:59+5:302021-02-23T15:51:13+5:30
भाविकांना मंदिरात न येण्याचे आवाहन
दावडी: कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे निमगाव व खरपुडी येथील खंडोबा मंदिर माघी यात्रेनिमित्त बंद राहणार आहे. तसेच शनिवारी (दि. २७) होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन करण्यात आले आहे.
निमगाव खंडोबा हे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. दरवर्षी माघ पोर्णिमा व चैत्र पोर्णिमेला खंडोबा देवाची मोठी यात्रा भरते. लाखो भाविक खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात. तळी भंडार, कुलधर्म, जागरण, गोंधळ घालण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टी, पुजारी, ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निमगाव खंडोबा मंदिर दि. २६ ते २८ फ्रेबुवारी पर्यत बंद राहणार आहे. शनिवार दि. २७ होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिर ३ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान खंडोबा मंदिराकडे येणारे सर्व रस्ते ३ दिवस बंद करण्यात येणार आहे. देवाचे मानापानाचे धार्मिक कार्यक्रम,पालखी मिरवणुक सोहळा मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष बबनराव शिंदे, उपाध्याक्ष संतोष शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे,पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी केले आहे.
प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेले खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील खंडोबा मंदिर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी माघ पोर्णिमा यात्रानिमित्त देवाच्या दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, हिरामण मलघे, पुजारी राजेश गाडे यांनी केले आहे.