वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा, जोगेश्वरीची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:21+5:302021-02-24T04:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सासवड : पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांची गुरुवार (दि.२५) पासून होणाऱ्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. १२ दिवस चालणारी यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आली असून नागरिकांनी मंदिरात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली आहे. वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा तसेच जोगेश्वरी यात्रेच्या नियोजनाबाबत मंगळवारी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद झाली. यामध्ये भोर उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. गुरुवारपासून ९ मार्चपर्यंत वीर येथे संचारबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे आदींना मनाई करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. केवळ परवानाधारक, मोजक्या वेळेत आणि मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहे. नागरिक, भाविकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. श्री क्षेत्र कोडीत येथून श्री क्षेत्र वीरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या मानाच्या पालखीचा कोडीत गावातील उत्सवही अत्यंत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश पोलीस सयंत्रणेने ग्रामस्थांना दिले आहेत. ही पालखी वाहनातून नेण्यात येणार असल्याने कोडीत ते वीर या मार्गावरदेखील भाविकांनी कोणत्याही स्वरूपाची गर्दी करू नये, असेही आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी केले आहे.