यवतला तीन दिवसांनी पाणी
By admin | Published: May 5, 2017 02:06 AM2017-05-05T02:06:40+5:302017-05-05T02:06:40+5:30
यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा
यवत : यवत गावठाण परिसरात वाढत्या उन्हाळ्याबरोबरच तीव्र पाणीटंचाईदेखील जाणवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेमधून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
दौंड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवत गावात मागील काही वर्षांत उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस गावातील लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत व शासनाने शास्वत योजना केली नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
यंदा एप्रिल महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली होती. आता मे महिना सुरु झाल्यानंतर यात आणखी भर पडली आहे. तीन दिवसांतून एकदा नळाला पाणी येत असल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे. गावातील बहुतांश खासगी बोअरवेलचे पाणी गेल्याने त्यांनाही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
नागरीवस्तीमध्ये पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक खासगी टँकरमधील पाणी विकत घेत आहेत. यामुळे गावातील खासगी टँकर असणाऱ्यांचे धंदे जोमात आले असले, तरी विकतच्या पाण्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.
यवतसाठी जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन माटोबा तलावाजवळ विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र, सदर योजनेच्या विहिरीला आता पाणी कमी पडू लागल्याने केवळ चार तास मोटर चालते. अत्यंत कमी पाणी गावापर्यंत पोहोचत आहे.
गावातील डॉ.अजितकुमार गांधी यांची बोअरवेल व यवत स्टेशन येथील बाहेती यांच्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी मिळाले आहे. मात्र, तरीही मिळणारे पाणी लोकसंख्येच्या मानाने अत्यंत कमी असल्याने गावात पाणीटंचाई जाणवत असल्याचे मत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
पाणीटंचाईमुळे महिलावर्गात तीव्र नाराजी
खासगी टँकरसाठी ३०० रुपये देऊन विकत घ्यावे लागते पाणी. नवीन मुठा कालव्याचे आवर्तन सुरु होऊन तेरा दिवस उलटले, तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांमध्ये वाढती नाराजी दिसत आहे.
पुणे शहराच्या जवळ असल्याने यवतमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने गृहप्रकल्प होत आहेत. सद्यपरिस्थितीत गावात दीड हजार सदनिका आहेत, तर आणखी नवीन कामे सुरु होत आहेत.
गावठाण, स्टेशन रोड परिसरात नागरीकीकरण वाढतच आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक राहात असून झोपड्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत असल्याने शासनाने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मोठी पाणीपुरवठा योजना यवतमध्ये राबविणे गरजेचे आहे.