यवतला चोरट्यांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:36 AM2017-11-29T02:36:20+5:302017-11-29T02:36:32+5:30
गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरलेल्या दोन दुचाकी तेथेच सोडून चोरांना पाय काढावा लागला.
यवत : गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरलेल्या दोन दुचाकी तेथेच सोडून चोरांना पाय काढावा लागला.
यवत येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहकारनगर भागात चोरांनी थैमान घातले. भाजपाच्या महिला उपाध्यक्षा मंगल किरण खेडेकर यांच्या घराचे शटर उचकटून चोरांनी तेथे चोरीचा प्रयत्न केला. मात्र, खेडेकर यांच्या मुलीचे लग्न दोनच दिवसांपूर्वी झालेले असल्याने त्यांच्या घरात जास्त पै-पाहुणे मुक्कामी होते. शटर उचकटल्यानंतर आतमधील लोकांनी विरोध करताच चोरांनी त्यांच्या हातातील तोडलेली कुलुपे त्यांना मारून तेथून पळ काढला. या वेळी खेडेकर यांच्या जावयाच्या पायाला कुलूप लागून मार बसला. चोरांनी तेथून पळ काढला. मात्र, जवळच रामा कोळी यांच्या भाड्याने दिलेल्या खोलीतील एकाचा मोबाईल व खोटे दागिने चोरांनी लंपास केले.
यवत विश्रामगृहानजीक देखील दोरगे यांच्या घराजवळील नागरिकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावून चोर एक दुचाकी पळवत होते. मात्र अचानक कोणीतरी आल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी पळ काढला. यवत गावठाणात सुतारवाडा येथे राहणारे राजेंद्र विजय गुजर यांची व इतर एकाची अशा दोन दुचाकी चोरांनी लॉक तोडून ढकलत चालविल्या होत्या. मात्र, त्या वेळी तेथे गावातील संदीप उत्तम गायकवाड, बापू शेंडगे व एक जण आले असता त्यांना चोरटे असल्याचे जाणवल्याने त्यांनी त्यांना हटकले. यामुळे दोन्ही दुचाकी तेथेच सोडून चोरांनी पळ काढला. मात्र त्या वेळी चोरांच्या हातात कोयते असल्याने गावातील युवकांनी त्यांचा पाठलाग करायचे टाळले. एकंदरीत काल रात्री चोरांनी गावात धुमाकूळ घातला असताना नागरिकांनी जागरूकता दाखवल्याने तीन दुचाकी चोरीला जाता जाता वाचल्या. मात्र, कालच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
यवत ग्रामपंचायतीने नुकत्याच बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत गावात चोरटे दिसत आहेत. मात्र चोरांनी तोंडे बांधलेली असल्याने त्यांचे चेहरे मात्र दिसत नाहीत. आता चोरांची दहशत पोलीस संपविणार तरी कसे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. माजी उपसरपंच समीर दोरगे यांनी गावातील चोºया थांबण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी केली आहे.