यवतमाळ साहित्य संमेलन : नयनतारा सहगल करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:33 AM2018-12-27T02:33:22+5:302018-12-27T02:33:33+5:30
यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे.
पुणे : यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत, ललित गद्यानुभव, गदिमांवर विशेष कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची संमेलनात रेलचेल असेल.
नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ ते १३ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. ढेरे यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचीही उपस्थिती असेल. संमेलनाचा समारोप केंद्रीय रस्ते आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित राहतील.
तीन दिवसीय संमेलनात चार परिसंवाद, एक कवीसंमेलन, कवितावाचन, वºहाडी बोली कवींचे स्वतंत्र कवी संमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, तांड्यांच्या पोडांच्या कथा-व्यथा, अनुभवकथन, मान्यवरांचा सत्कार, गदिमांच्या कार्यकर्तुत्वावरील विशेष सांगीतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन, प्रकाशन मंच, कवीकट्टा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
‘प्राचार्य राम शेवाळकर विचारपीठ’
संमेलन परिसराला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपाला ‘शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर’ तर बचत भवन येथील कार्यक्रम स्थळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपातील व्यासपीठाला ‘प्राचार्य राम शेवाळकर विचारपीठ’ असे नाव देण्यात आले आहे.
उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैैदानावरुन ग्रंथदिंडी निघून संमेलन स्थळापर्यंत जाणार आहे. या ग्रंथदिंडीमध्ये शेतकऱ्यांची बैैलबंडी, गुरुकुंज मोझरीचे भजन मंडळ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चित्र, कलशधारी मुली, संतांच्या वेशातील मुले, मुली असतील. बंजारा, तिज, लेंगी, आदिवासी लोकनृत्य पथक, दंडार पथक, लेझीम पथक, साहित्यिकांचे दर्शन अशा विविध बाबींचा समावेश असेल.