यवतच्या यादववाडीत पावसाविना पूर
By admin | Published: September 15, 2016 01:40 AM2016-09-15T01:40:11+5:302016-09-15T01:40:11+5:30
दौंड तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारलेली आहे. यवत स्टेशननजीक असलेल्या यादववाडी मध्ये मात्र पाऊस नसतानाही पुराचा अनुभव शेतकरीवर्गाला आला.
यवत : दौंड तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारलेली आहे. यवत स्टेशननजीक असलेल्या यादववाडी मध्ये मात्र पाऊस नसतानाही पुराचा अनुभव शेतकरीवर्गाला आला.
यवत व खामगाव परिसरात नवीन मुठा उजवा कालव्याच्या वितरिका क्र. १८ व क्र. १९ वरून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. खोडसाळपणे कोणी तरी वितरिका क्र. १८ चा भराव फोडल्याने अनेकांच्या शेतात पाणी घुसले, तर यादववस्ती (यवत) येथे काही घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी : नवीन मुठा उजवा कालव्याच्या वितरिका क्र.१८ व क्र.१९ वरून पाण्याचे आवर्तन काल रात्री सुरू करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास वितरिका क्र.१८ ला कासुर्डी गावाच्या हद्दीत कोणी तरी भगदाड पाडले. वितरिका क्र.१८ व जुना कालवा एकमेकांना विभागून जात असलेल्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने जुन्या कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर तेथे भराव टाकला होता. या ठिकाणावरून नवीन मुठा कालव्याचे पाणी खामगावकडे जात होते. जुन्या कालव्यात टाकलेल्या भरावाला रात्रीच्या सुमारास भगदाड पाडल्याने वितरिका क्र.१८ मधील पाणी जुन्या कालव्यातून वितरिका क्र.१९ मध्ये थेट येऊ लागले. यामुळे आधीच पाणी भरून वाहणाऱ्या वितरिका क्र.१९ मधून अतिरिक्त होणारे पाणी मोठ्या दाबाने आजूबाजूच्या शेतात व वस्त्यांमध्ये घुसले. ही बाब यादववाडी परिसरात राहणारे सचिन धनशेट्टी यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने मध्यरात्रीच्या सुमारास यवत स्टेशन रोड येथील संजय जगताप यांना याबाबत माहिती दिली.
संजय जगताप यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्री १ वाजण्याच्या सुमारास पाणी घुसलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व याची माहिती पाटबंधारे विभागाचे यवत शाखा क्र.२ चे शाखा अधिकारी के. बी. खुटवड यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार जगताप यांनी दोन्ही वितरिकांचे पाणी बंद केले. यानंतर मध्यरात्री पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वितरिका क्र.१८ फोडण्यासाठी संबंधित व्यक्तीने जे.सी.बी.मशिनचा वापर केला असल्याची शक्यता आहे. भराव फोडलेल्या ठिकाणी तेथून मोठमोठे दगड बाजूला काढल्याचे दिसून येत होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे आज अनेकांची शेती पाण्याखाली गेली होती. सकाळच्या सुमारास यवतचे उपसरपंच सुभाष यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.