यवतचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:24+5:302021-06-28T04:09:24+5:30
यवत : यवत ग्रामपंचायतीच्या थकीत प्रश्नी आमदार राहुल कुल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीने थकीत रकमेपैकी ३ लाख ...
यवत : यवत ग्रामपंचायतीच्या थकीत प्रश्नी आमदार राहुल कुल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीने थकीत रकमेपैकी ३ लाख ८९ हजार रूपये भरले असून ग्रामपंचायतीला वेठीस न धरता पाणी सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर यवतचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. या प्रकरणी लोकमतने वृत्त दिले होते. त्याची दखल घेत आमदारांनी मध्यस्ती करून या प्रकरणी तोडगा काढला.
थकीत वीजबिलामुळे दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज कनेक्शन महावितरणने तोडले होते. यवत ग्रामपंचायतीचेही वीज कनेक्शन याच कारणामुळे तोडले होते. पाणी आणि वीज नसल्याने याचे राजकीय पडसाद उमटले होते. महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून थकीत वीजबिल भरण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधी वापरण्याचे सूचित केले होते. मात्र, यातदेखील काही अडचणी असल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जात होते.
यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे यांनी शनिवारी (दि. २६) रात्री उशिरा दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधून नळ पाणीपुरवठा योजनांबाबत मार्ग काढून देण्याची मागणी केली होती. कुल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ग्रामपंचायतींना वेठीस न धरता यावर तोडगा काढण्यास सांगितले. या वेळी ग्रामपंचायतीने चालू थकबाकी भरल्यास वीजपुरवठा तातडीने जोडून देण्याचा तोडगा काढला.
यवत ग्रामपंचायतीने तातडीने आज (दि. २७) आमदार राहुल कुल यांच्या हस्ते महावितरण केडगाव विभागाचे अधिकारी संजय मालपे, यवत उपविभागाचे प्रकाश काकडे यांच्याकडे ३ लाख ८९ हजार रुपयांचे धनादेश सुपूर्त केले. या वेळी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, गौरव दोरगे उपस्थित होते. धनादेश प्राप्त होताच ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेची वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
चौकट क्रमांक १ :-
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे नळ पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी आहे. यावर राज्य पातळीवर योग्य तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- आमदार राहुल कुल
चौकट
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून वीजबिल भरण्यास ग्रामसभेची मंजुरी आवश्यक होती. ग्रामसभा घ्यायला कोरोना साथीमुळे परवानगी नाही. यामुळे बिल देण्यास विनाकारण उशीर झाला असता. यात यवतमधील नागरिकांचे पाण्याअभावी अनेक दिवस हाल झाले असते. याचे राजकारण करण्याचा प्रयत्न गावातील विरोधकांनी केला. मात्र आम्ही फालतू टीकेकडे लक्ष न देता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आणि केवळ एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला.
- समीर दोरगे, सरपंच, यवत
फोटो ओळ :- थकीत वीजबिलाचा धनादेश आमदार राहुल कुल यांच्या हस्ते महावितरणचे अधिकारी संजय मालपे व प्रकाश काकडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी सरपंच समीर दोरगे, इम्रान तांबोळी, गौरव दोरगे.