सवाई गंधर्व महाेत्सवात यंदा नवाेदितांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:47 PM2018-11-22T20:47:04+5:302018-11-22T20:48:13+5:30

केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींकरिता आनंदाची पर्वणी असणा-या यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरमंडप युवा कलाकारांच्या सादरीकरणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नवा सूर, नवा ताल आणि नव्या लयीच्या नवोदितांच्या सुरावटींची आगळीवेगळी पर्वणी रसिकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे.

This year, new opportunities for newcomers to Sawai Gandharva Mohatchav | सवाई गंधर्व महाेत्सवात यंदा नवाेदितांना संधी

सवाई गंधर्व महाेत्सवात यंदा नवाेदितांना संधी

Next

पुणे : केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींकरिता आनंदाची पर्वणी असणा-या यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरमंडप युवा कलाकारांच्या सादरीकरणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नवा सूर, नवा ताल आणि नव्या लयीच्या नवोदितांच्या सुरावटींची आगळीवेगळी पर्वणी रसिकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे.  आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ह्यसवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी बुधवार दि. १२ डिसेंबर ते रविवार दि. १६ डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे.
 
   यंदा महोत्सवाचे ६६ वे वर्ष असून यावर्षीच्या महोत्सवात कला प्रस्तुती करणा-या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल ३१ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचा देखील सहभाग असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली. महोत्सवाच्या सुरुवात (बुधवार 12 डिसेंबर) महोत्सवाच्या जागा बदलाविषयी  जोशी म्हणाले,  यावर्षी महोत्सव हा नवीन जागेत होणार आहे त्यामुळे आम्हालाही औत्सुक्य आहे. शास्त्रीय संगीताचे पावित्र्य जपत केलेल्या नवनवीन प्रयोगांना  रसिक श्रोत्यांनी आतापर्यंत भरघोस प्रतिसाद आणि दाद दिली आहे. त्यामुळे या वर्षीच्या महोत्सवाचा बदल स्वीकारत पुणेकर आणि देशविदेशातून येणारे रसिक श्रोते यावषीर्ही सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाठीशी उभे राहतील असा आमचा विश्वास आहे.   

महोत्सवातील कार्यक्रमांचे वेळापत्रक व सादरीकरण करणारे कलाकार
दिवस पहिला :  १२ डिसेंबर रोजी औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादनाने दुपारी ३ वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पं. अरुण कशाळकर यांचे शिष्य असलेल्या ग्वाल्हेर- आग्रा घराण्याच्या रवींद्र परचुरे यांचे गायन होईल.परचुरे हे मूळचे उज्जैनचे असून सिंगापूर येथील टेंपल आॅफ फाईन आर्ट्स या संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षक आहेत. त्यानंतर दिवंगत सतारवादक अन्नपूणार्देवी यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने त्यांचे शिष्य बसंत काब्रा यांचे गिटारवादन होईल. त्यानंतर रशीदखाँ यांचे शिष्य प्रसाद खापर्डे आपली गायनसेवा सादर करतील. प्रसाद खापर्डे हे रामपूर-सहसवान घराण्याचे गायक आहेत.त्यानंतर पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

दिवस दुसरा :     १३ डिसेंबर या महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात बनारस घराण्याच्या डॉ. रिता देव यांच्या गायनाने होईल. देव या दिवंगत गायिका गिरिजादेवी यांच्या शिष्या असून गिरिजादेवी यांना या निमित्ताने आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्याचे युवा गायक सौरभ साळुंखे यांचे गायन होईल. पतियाळा घराण्याचे पं. प्रकाशसिंह साळुंखे यांचे सौरभ हे पुत्र आणि शिष्य असून त्यांच्या घराण्याचे पूर्वज हे हैदराबादच्या निजामाच्या दरबारात राजगायक होते. त्यानंतर प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा यांचे संतूर वादन होईल. पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने दुस-या दिवसाची सांगता होईल.

दिवस तिसरा :  १४ डिसेंबर रोजी ग्वाल्हेर- जयपूर घराण्याच्या अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिस-या दिवसाला सुरुवात होईल. अपर्णा पणशीकर या भास्करबुवा जोशी आणि मीरा पणशीकर यांच्या शिष्या आहेत. त्यानंतर पंजाबच्या रागी बलवंत सिंग यांचे गायन होणार आहे. रागी बलवंत सिंग हे पंजाबातील शास्त्रीय संगीताची एक जुनी परंपरा आपल्या सादरीकरणामधून उपस्थित रसिक श्रोत्यांसमोर आणतील. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचे दिवंगत व्हायोलिनवादक डी. के. दातार यांचे शिष्य असलेले मिलिंद रायकर व त्यांचे पुत्र यज्ञेश रायकर हे व्हायोलिन वादन करतील. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिस-या दिवसाचा समारोप होईल.

दिवस चौथा :  चौथ्या दिवशी  (१५ डिसेंबर)  बंगळुरूचे दत्तात्रय वेलणकर यांच्या गायनाने चौथ्या दिवशीचा महोत्सवातील पहिल्या सत्राला सुरुवात सुरु होईल. वेलणकर हे ग्वाल्हेर किराणा घराण्याचे पं. विनायक तोरवी यांचे शिष्य आहेत. यानंतर वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या व गायिका सावनी शेंडे यांचे गायन होणार आहे. यानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरीवादक विवेक सोनार यांचे बासरीवादन होणार आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी हे यानंतर गायन सादर करतील. त्यानंतर आग्रा जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित यांचे गायन होणार आहे. इंदौरचे ज्येष्ठ गायक पं. गोस्वामी गोकुलोत्सव महाराज हे चौथ्या दिवशी गायन सादर करतील. इमदादखानी घराण्याचे उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतार वादनाने या दिवसाचा समारोप होईल.

दिवस पाचवा :  महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायकबंधू अर्शद अली व अमजद अली यांचे गायन होईल. आपले उस्ताद मामा मशकुर अली खॉं आणि उस्ताद मुबारक अली खॉं यांचे ते शिष्य आहेत. यानंतर ज्येष्ठ गायक गजानन बुवा जोशी यांच्या नाती अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे सहगायन होईल.यानंतर प्रसिद्ध वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिन वादक इंद्रदीप घोष हे यांचे सहवादन रसिकांना पर्वणी ठरणार आहे.  त्यानंतर पं. जसराज यांचे ज्येष्ठ शिष्य आणि गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल. यानंतर ज्येष्ठ सतारवादक देबु चौधरी यांचे शिष्य व पुत्र प्रतिक चौधरी हे सतारवादन करतील. प्रतिक चौधरी सेनिया घराण्याचे सतारवादक आहेत. यानंतर ज्येष्ठ कथक गुरु पं. बिरजू महाराज आणि त्यांची शिष्या शास्वती सेन यांची कथक प्रस्तुती होईल आणि परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता होईल.
 
* यावर्षी महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार  
रवींद्र परचुरे, बसंत काब्रा, डॉ. रिता देव, रागी बलवंत सिंग, मिलिंद रायकर- यज्ञेश रायकर, दत्तात्रय वेलणकर, विवेक सोनार, प्रतिक चौधरी, सौरभ साळुंखे, अपर्णा पणशीकर, निर्मला राजशेखर, इंद्रदीप घोष 

*  महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (12 डिसेंबर)  दुपारी ३ ते रात्रौ १० अशी महोत्सावाची वेळ असेल. १३ व १४ डिसेंबर रोजी महोत्सवाला दुपारी ४ वाजता सुरुवात होणार असून   तो रात्रौ १० वाजेपर्यंत सुरु राहील.  १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता महोत्सवाला सुरुवात होऊन परवनागी नुसार तो रात्रौ १२ पर्यंत चालेल.  रविवार दि. १६ डिसेंबर हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून त्यादिवशीची वेळ  दुपारी १२ ते रात्रौ १० अशी राहणार आहे. 

Web Title: This year, new opportunities for newcomers to Sawai Gandharva Mohatchav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.