यंदा बटाटा कडाडणार!
By admin | Published: November 5, 2014 11:12 PM2014-11-05T23:12:20+5:302014-11-06T00:53:22+5:30
लहरी हवामानाचा फटका रब्बी हंगामातील बटाटापिकाला बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेले बटाटापीक वाया गेले आहे.
विलास शेटे, मंचर
लहरी हवामानाचा फटका रब्बी हंगामातील बटाटापिकाला बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेले बटाटापीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी नवीन बटाटालागवड करण्यास धजावत नाही. बियाण्याचे वाढलेले बाजारभाव, वातावरणातील फरक यांमुळे मंचर बाजार समितीत शेतकरी बटाटा खरेदीस येत नसल्याने अक्षरश: शुकशुकाट पसरला आहे. या वर्षी ५० टक्के बटाटा लागवड होणार असून, त्यामुळे भविष्यात खाण्याच्या बटाट्याचा तुटवडा भासून बाजारभाव कडाडणार आहेत.
मागील २५ वर्षांतील सर्वांत कमी लागवड या वर्षी बटाट्याची झाली आहे. नोव्हेंबर महिना हा बटाटा लागवडीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, प्रथमच बाजार समितीत बटाटा वाणखरेदीसाठी शेतकरी येत नसल्याने अक्षरश: शुकशुकाट पसरला आहे. एरवी १५ जानेवारीला बटाटा वाणविक्री बंद होते. या वर्षी ती नोव्हेंबरअखेरीस बंद होण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला बटाट्याला बाजारभाव जास्त असूनही मागणी होती. चार हजार रुपये क्विंटल या दराने बटाटा वाण विकत घेऊन त्याची लागवड शेतकऱ्यांनी केली. दोन महिन्यांपूर्वी लागवड झालेला बटाटावाण अक्षरश: वाया जाण्याची चिन्हे आहेत. लहरी हवामानाचा फटका बटाटापिकाला बसला असून, अनेक रोगांचा विळखा पडला आहे. लाल कोळी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शर्थ करावी लागत आहे. सुरुवातीस लागवड केलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी बटाटालागवड करण्यास फारसा उत्सुक नाही. बटाटावाणाच्या बाजारभावाने या वर्षी उच्चांक गाठला. क्विंटल तीन ते चार हजार रुपये हा बाजारभाव पाहून अनेक शेतकऱ्यांनी बटाटालागवड करण्याचा बेत रद्द केला. बटाटापिकाला थंडी पोषक असते. मात्र, या वर्षी थंडी फारशी नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात सार्थरता आहे. (वार्ताहर)