यंदा द्राक्ष उत्पादनात ९ लाख टनांनी होईल घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 06:09 AM2019-11-13T06:09:20+5:302019-11-13T06:09:53+5:30
अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले
पुणे : अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे राज्यातील द्राक्ष पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादनात यंदा आठ ते ९ लाख टनांनी घट होण्याची शक्यता आहे. निर्यातीलाही त्याचा फटका बसणार आहे. अतिपावसाने घड कुजणे, मण्यांना तडा जाणे, डावणी व करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागल्याने द्राक्ष बागाईतदारांचे कंबरडेच मोडणार आहे.
राज्यात जुलै आणि सप्टेंबरमध्ये जोरदार वृष्टी झाली. दिवाळीतही पावसाची हजेरी होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे आॅक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षांसह भात, बाजरी, मका, भाजीपाला, ऊस व फळबागांचेही नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांचे १ लाख १५ हजार ७४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. द्राक्षाचे आगार समजल्या जाणाºया नाशिक जिल्ह्यात सुमारे तीस टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागांचे नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर व जुन्नर येथील बागांचे नुकसान झाले आहे. त्यात नानापर्पल, फ्लेम सिडलेस, जंबो सिडलेस व शरद सिडलेस द्राक्षांचा समावेश आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले म्हणाले की, राज्यात ४० ते ४२ दिवस जोरदार पाऊस झाला. द्राक्ष पीक साडेचार ते पाच महिन्यांचे असते. नोव्हेंबरमध्ये द्राक्षे छाटणीला येतात. पावसामुळे फुलोरा, मणी धरणे ते छाटणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात द्राक्ष बागांना नुकसानीचा सामना करावा लागला.
राज्यात द्राक्षाचे तब्बल साडेतीन
ते चार लाख एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ८० ते ९० हजार हेक्टरवरील बागांचे साठ ते शंभर टक्के नुकसान झाले आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ३५ लाख टन द्राक्षांचे उत्पादन होते. त्यातील अडीच लाख टन द्राक्षांची निर्यात होते. उर्वरित द्राक्षे ही स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. यंदा ८ ते ९ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे.
>विमा सक्तीचा करावा
द्राक्ष पिकासाठी शेतकºयांना १५ हजार ४०० रुपये विमा शुल्क भरावे लागते. तितकेच शुल्क सरकार भरते. सरकारने पन्नासऐवजी ९० टक्के विमा शुल्क भरावे. त्यानंतर, विमा उतरविणे सक्तीचे करावे.
- कैलास भोसले, खजिनदार,
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ