यंदा रब्बी सरासरी ओलांडणार
By admin | Published: September 28, 2016 04:37 AM2016-09-28T04:37:49+5:302016-09-28T04:37:49+5:30
खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात
बारामती : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ११२ टक्के व सरासरी ३७७.१० मिलिमीटर पाऊस झाल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले.
बारामती तालुक्यात सरासरी ३५२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सलग चार वर्षे दुष्काळामुळे बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. पाणीटंचाईची समस्या कायमच या परिसरात गंभीर होती. टंचाईच्या काळात तब्बल ३४ टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरू होता. यंदाही पावसाळ्यातील पहिले तीन महिने कोरडे गेल्याने सलग पाचव्या वर्षीदेखील दुष्काळाचे अरिष्ट्य ओढवणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळाच्या शक्यतेने बाजारपेठेतदेखील मंदीचे वातावरण होते. मात्र, परतीच्या पावसाने यंदा बारामती तालुक्यावर चांगलीच कृपा केली. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे ओढे-नाले खळाळू लागले आहेत. बारामती तालुक्यात जलयुक्त शिवारची ६९२ कामे झाली आहेत. खोलीकरण झालेल्या कामांमधून तालुक्यात ७, ४४९ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढेल.
बारामती हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारीच्या पेरणीखाली मोठे क्षेत्र असते. रब्बी हंगामात बारामती तालुक्यात सरासरी ३७ ते ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊसमान चांगला असल्याने याच लागवड क्षेत्रात २ ते ३ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रब्बीमध्ये उशिरा गहू आणि हरभऱ्याच्यादेखील पोरण्या होतील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
उंडवडीमध्ये सरासरीच्या
५० टक्केच पाऊस...
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार परिसरात सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसराला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असे असले, तरी खडकवासला कालव्यातून आवर्तन मिळाल्यास या परिसरातदेखील रब्बी हंगाम जोर धरेल.
शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती येणार...
सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले होते. यंदा पावसाने सरासरी ओलंडल्यानंतर जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याची आशा आहे. पाऊस लांबल्याने यंदादेखील चिंतेचे सावट होते. शेवटच्या टप्प्यातदेखील पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याने आशा सोडली होती. मात्र, वरुणराजाने कृपा केली.
जिरायती पट्ट्यात दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. टंचाईच्या काळात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले होते. पाऊस झाल्याने आता चारा पिकांच्या लागवडीही मोठ्याप्रमाणात होतील. त्यामुळे पुन्हा एकदा दुग्धव्यवसायाला गती मिळेल.