यंदा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिंकली शर्यत
By Admin | Published: January 4, 2016 01:07 AM2016-01-04T01:07:18+5:302016-01-04T01:07:18+5:30
यावर्षी घराचे स्वप्न उराशी बाळगून ६७ वर्षीय लता करे या तिसऱ्यांदा रविवारी शरद मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावल्या आणि त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ मिळवली
बारामती : यावर्षी घराचे स्वप्न उराशी बाळगून ६७ वर्षीय लता करे या तिसऱ्यांदा रविवारी शरद मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावल्या आणि त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ मिळवली. पहिल्या वर्षी पतीचे हृदय ‘चालावे’ यासाठी तर यंदा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या धावल्या. अडीच किलोमीटरचे अंतर धावत नगर परिषदेसमोरची ‘क्रॉस लाईन’ पार केली आणि बारामतीकरांनी टाळ््या वाजवून प्रतिसाद दिला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची सुरुवात सकाळी ६.३० वाजता झाली. त्यामध्ये इतर वयोगटातील स्पर्धकांसह करे देखील सहभागी झाल्या. झेंडा फडकताच लाल साडी परिधान केलेल्या करे भरधाव वेगाने धावल्या. कडाक्याच्या थंडीत वयाची तमा न बाळगता त्या अनवाणी धावल्या.
करे यांना ३ मुली, १ मुलगा, पती, सून, नातवंडे असा परिवार आहे. तिन्ही मुलींचे विवाह झाल्यानंतर हे कुटुंब पाच वर्षांपूर्वी बारामती तालुक्यात वास्तव्यास आले आहेत. बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. करे यांच्या यशाच्या हॅट्ट्रिकने हा निर्णय सार्थ ठरवला आहे.