यावर्षीही वारकऱ्यांचा मुक्काम अडचणीत, लोणी काळभोर पालखी तळ अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:14 AM2018-06-10T01:14:04+5:302018-06-10T01:18:19+5:30
श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३३वा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी (९ जुलै) लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखी तळासाठी सहा वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली होती.
लोणी काळभोर - श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३३वा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी (९ जुलै) लोणी काळभोर येथे मुक्कामी येत आहे. येथील पालखी तळासाठी सहा वर्षांपूर्वी जागा आरक्षित करण्यात आली होती. यावर्षी प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाली. २८ मेपर्यंत सर्व काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश काम अपूर्ण असल्याने यावर्षीही पालखीतळावर वारकºयांना मुक्काम करता येणार नाही हे नक्की झाले आहे.
केवळ हवेलीतीलच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालखीतळांपैकी सर्वात मोठा पालखीतळ लोणी काळभोर परिसरात विकसित होत आहे. प्रतिवर्षी वाढणारी वारकरी संख्या व त्यांच्या निवासाची योग्य सोय व्हावी याचा दूरगामी विचार करून सन २०१२मध्ये तत्कालिन उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल व हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के यांनी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या १५ एकर खानपड व गायरान जमिनीवर पालखीतळ म्हणून आरक्षण टाकले होते. त्या वेळी या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, पोहण्याचा तलाव, समाज मंदिर, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, मुलांना खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण, व्यायामशाळा, शौचालयाची सुविधा, तसेच पक्ष्यांना आश्रय देण्यासाठी वड, पिंपळासारख्या मोठ्या झाडाचे वृक्षारोपण आदी बाबी करण्याचे नियोजित होते.
सदर तळ वर्षातून फक्त दोन दिवस पालखीसाठी, तर उर्वरित ३६३ दिवस लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या स्थानिक नागरिकांना विविध सामाजिक, धार्मिक व इतर उपक्रमांसाठी अल्पदरात उपलब्ध करून द्यायचे त्यावेळी ठरले होते.
२६ मे २०१२ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. येथील दगडखाणीच्या जागेवर सुमारे २0 फूट खोल व तेवढेच रुंद खड्डे होते. ते भरून काढणे म्हणजे दिव्य होते. तत्कालीन गावकामगार तलाठी गेणभाऊ शेवाळे यांनी विकसनाचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन लोकसहभागातून येथे दगड, माती व राडारोडा टाकून घेतला. तीन ठिकाणी घेण्यात आलेल्या विंधनविहिरींना मुबलक प्रमाणात पाणीही लागले होते. येथील सुमारे पन्नास टक्के जागा राहण्यायोग्य केली होती. १५ जून रोजी पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये आला त्या वेळी काही दिंड्यांनी या ठिकाणी प्रथमच मुक्कामही केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखीतळ आपल्या गावात होत असल्याचा अभिमान येथील ग्रामस्थ बाळगून होते. १६ जून रोजी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला त्यानंतर सर्वांनीच या पालखीतळाकडे पाठ फिरवली.
पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे मुक्काम विठ्ठल मंदिरात असतो. येथे जागा प्रशस्त असल्याने कसलीही अडचण येत नाही. प्राथमिक शाळा, हायस्कूल, गावातील मंदिरे व गावठाणातील मोकळी मैदाने या ठिकाणी दिंड्या मुक्कामी असतात. पाऊस नसेल तर कसलीही अडचण येत नाही. परंतु पाऊस आला तर उघड्या मैदानात उतरलेल्या दिंड्यांच्या तंबूत पावसाचे पाणी जाते. त्यामुळे त्या दिंड्यातील वारकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पालखीतळ झाला तर या अडचणींपासून त्यांची सुटका होणार असल्याने तो लवकर व्हावा अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
गेल्या सहा वर्षांत येथे कोणतेही काम झाले नसल्याने येथे राडारोड्याचे साम्राज्य आहे. उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल व हवेलीचे तहसीलदार संदेश शिर्के या दोघांचीही प्रशासकीय कारणावरून बदली झाली. त्यानंतर आलेल्या सर्वच शासकीय अधिकाºयांनी या पालखीतळाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. परंतु तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून दोन कोटी रुपये उपलब्ध झााल्याने पालखीतळाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. संंरक्षक भिंत व सभामंडपाची कॉलम उभारणी काम पुढे न सरकल्याने वारकºयांना इतरत्र मुक्काम करावा लागणार आहे.
दोन महिन्यांत काम होणार पूर्ण
जागा ताब्यात न मिळाल्याने यावर्षी पालखी सोहळा येण्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही. उपलब्ध झालेल्या १ कोटी ५० लाख रुपये निधीतून चारही बाजूस संरक्षक भिंत, पालखीसाठी चार हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडप, त्यामध्ये विश्वस्तांसाठी दोन खोल्या, स्वयंपाकघर, अंघोळ व शौचालयाची सुविधा, पालखीतळावर वारकºयांसाठी चारही बाजूस पिण्याच्या पाण्याची सोय, दोन कमानी, ४ ठिकाणी पोलीस वॉच टॉवर, ६ ठिकाणी हायमास्ट दिवे टॉवर आणि अंतर्गत रस्ते करण्यात येणार आहेत. सदर सर्व कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहेत.
- सचिन टिळक, शाखा अभियंता सार्वजनिक
बांधकाम दक्षिण विभाग
जिल्ह्यातील सर्व पालखीतळांचा विकास शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. येथील पालखीतळाच्या जागेचे हस्तांतरण देहू संस्थानकडे वेळेवर झाले नाही. हस्तांतरण झाल्याने तळाच्या विकासाचे काम युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. तेथे वारकºयांच्या एकदिवसीय निवाºयासाठी वीज, पाणी, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था व इतर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा करण्यात येणार आहेत.
- सुनील दिगंबर मोरे, विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, सोहळा प्रमुख