पुण्यावर पाऊस मेहेरबान..! यंदा जुलैत १० वर्षातील सर्वाधिक बरसात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:32 PM2019-08-01T12:32:56+5:302019-08-01T12:35:23+5:30
अजून पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात राज्याबरोबरच पुण्यात पाऊस होण्याची शक्यता आहे़.
पुणे : यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी सातत्याने पाऊस कोसळत असल्याने जुलै महिन्यात पावसाने गेल्या १० वर्षातील सर्वाधिक पावसाची बरसात केली. दीड महिन्यात चार महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा झाला आहे़. पुण्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ५६६ मिमी पाऊस होतो़. ३१ जुलै रोजी सकाळपर्यंत तब्बल ५७४. ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
यंदा मॉन्सूनचे शहरात जूनच्या अखेरच्या आठवड्यात झाले़.मात्र, त्यानंतर त्याने जवळपास दररोज हजेरी लावत आपला बॅकलॉग भरुन काढला़. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला़. पावसाचा पहिला बहर ओसरला की दरवर्षी जुलै महिन्यात खंड पडतो़. अनेकदा हा खंड १० ते १५ दिवसांपर्यंत असतो़. यंदा मात्र, एक दोन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिन्यात नित्यनेमाने दररोज पाऊस हजेरी लावून जात होता़. कधी तो जोरदार बरसत होता़ तर कधी हलकीशी चाहूल देऊन जात होता़. यामुळे यंदा जून अखेरीस पडलेला धुवांधार पाऊस व त्यानंतर सातत्याने होत असलेली बरसात यामुळे चार महिन्याच्या पावसाची सरासरी जुलै अखेरीत ओलांडली़. जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल २५३ मिमी जादा पाऊस नोंदविण्यात आला आहे़. गेल्या दहा वर्षात जुलै महिन्यात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे़. गेल्या शंभर वर्षात पुण्यात जुलै १९०७ मध्ये सर्वाधिक ५८५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या १० वर्षात २०१४ मध्ये २८२. ४ मिमी पाऊस झाला होता़ तर २०१५ मध्ये सर्वात कमी ६२ मिमी पावसाची नोंद झाली होती़.
पुढील सहा दिवस शहरातल हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.
अजून पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात राज्याबरोबरच पुण्यात पाऊस होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे यंदा पुणेकरांसाठी मॉन्सून चांगला जाणार असल्याचे दिसून येत आहे़.
़़़़़़़़़़़