पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम’ रचनेची यंदा शताब्दी वर्षपूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:16+5:30
आज प्रजासत्ताक दिनी शंभर वर्षांपूर्वीची प्रचलित चाल ऐकण्याची पुणेकरांना संधी
नम्रता फडणीस
पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम’ या रचनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी प्रचलित केलेल्या या राष्ट्रगीताची जुनी चाल ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. उद्या (26 जानेवारी)प्रजासत्ताक दिनी सकाळी 10 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिर येथे हा योग जुळून आला आहे.
’वंदे मातरम’चे सूर कानावर पडताच देशभक्तीसह मातृभूमीसमोर नतमस्तक होण्याची भावना मनात संप्रेरित होते. देशाप्रति जाज्वल्य अभिमानाचे स्फुरण चढते. बकिमचंद्र चँटर्जी यांनी शब्दबद्ध केलेले ’वंदे मातरम’ गीत ‘देस’ रागात रचले गेले आहे हे सर्वश्रुत आहेच. आजपर्यंत या गीताला भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायकांनी विविध रागांमध्ये स्वरबद्ध केले. मास्तर कृष्णराव यांनी ‘वंदे मातरम’ ची रचना झिंजोटी रागात गुंफली. मात्र सर्वप्रथम 1920 च्या सुमारास पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी ‘काफी’ रागात ही रचना बांधली. या रागातून शरणागत भाव प्रतीत होईल असे त्यांचे ठाम मत होते. स्वत: पं. पलुसकर ही रचना स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहून सादर करीत होते. जाहीर सभेनंतर ‘वंदे मातरम’ म्हणण्याची प्रथा पलुसकरांनी सुरू केली. त्या नंतर त्यांचे शिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन ही रचना लोकमान्य टिळकांच्या सभांमध्ये सादर करीत असत. या रचनेला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजासत्ताक दिनी संगीताचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांना या गीताद्वारे मानवंदना आणि आदरांजली वाहिली जाणार असल्याचे पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या आणि माधुरी संगीत विद्यालयाच्या संचालिका गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ‘नादमाधुरी’ या आमच्या यू ट्यूब चॅनलवरून हे गीत प्रदर्शित होणार असून, पं. शौनक अभिषेकी आणि धनश्री गणात्रा यांनी हे गीत गायले असल्याचेही त्या म्हणाल्या.
पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांचे हिंदुस्थानी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी जी स्वरलिपी तयार केली ती आज ‘पलुस्कर पद्धती’ म्हणून ओळखली जाते. 1901 साली पलुस्कर यांनी लाहोर येथे ‘गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर पलुस्कर यांनी त्यांचे शिष्य पं. यशवंतबुवा मिराशी, पं. विनायकराव पटवर्धन, शंकर व्यास, बी.आर देवधर, ओंकारनाथ ठाकूर, शंकरराव बोडस यांना भारतातल्या विविध ठिकाणी हिंदुस्थानी संगीताचा प्रचार करण्यास पाठवले. संपूर्ण भारतात त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. त्यानुसार पं. विनायकबुवा पटवर्धन यांना पुण्यात पाठवले आणि त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. आमचे गुरू पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी आम्हाला ‘वंदे मातरम’ ची शंभर वर्षांपूर्वीची ही प्रचलित चाल शिकविली आणि हा अनमोल ठेवा आमच्या पिढीकडे सुपूर्त केला. प्रजासत्ताकदिनी जुन्या चालीवर आधारित ‘वंदे मातरम’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे ही यामागील इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------------------------------