औंदाचं साल कमी पावसाचं, सॅसकॉफचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:25 AM2019-05-09T06:25:45+5:302019-05-09T06:26:01+5:30
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात यंदा सरासरीपेक्षा सर्वसाधारणपणे ४० टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज ...
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात यंदा सरासरीपेक्षा सर्वसाधारणपणे ४० टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज साउथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) ने व्यक्त केला आहे़ राज्यातील बहुतांश धरणे ही सह्याद्रीच्या डोंगररांगामधून उगम पावणाऱ्या नद्यांवर आहेत़ या परिसरात सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत पाऊसमान कमी होण्याची शक्यता असल्यामुळे या धरणांमधील पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
दक्षिण आशियातील देशांनी मिळून हवामानाच्या दीर्घकालीन अंदाज तयार करण्यासाठी सॅसकॉफ संघटनेची स्थापना केली. यावेळचे १४ वे सॅसकॉफचे अधिवेशन नेपाळमधील काठमांडू येथे १८ ते २३ एप्रिल दरम्यान झाले़ या संस्थेने आगामी पावसाळ्याच्या काळातील पावसाचे विभागावर अंदाज दिले आहेत़ या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे़
गेल्या वर्षी २०१८ च्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील चारही हवामान विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता़ कोकण, गोवा
(-१ टक्के), मराठवाडा (-२२ टक्के), मध्य महाराष्ट्र (-९ टक्के) आणि विदर्भ (-८ टक्के) इतका कमी पाऊस झाला होता़ यामुळे राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यात आगामी मॉन्सूनच्या काळात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ या अंदाजानुसार धरणे पूर्ण भरण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ आगामी मॉन्सूनचा अंदाज आशादायक नसल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी चिंताजनक परिस्थिती उद्भवू शकते़
हवामान विभागाने दीर्घकालीन चार महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे़ त्याच वेळी त्यात ५ टक्के फरक होऊ शकतो, असे गृहीत धरले आहे़ तसेच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ४९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़
सॅसकॉफच्या अहवालानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे़ हा अहवाल अंतिम नसला तरी तो धोक्याचा इशारा देणारा आहे़ विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो़
-डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ़