यंदाचा वसंतोत्सव होणार ‘कट्यारमय’
By Admin | Published: January 5, 2016 02:20 AM2016-01-05T02:20:01+5:302016-01-05T02:20:01+5:30
सूर, लय आणि ताल यांच्या सुंदर मिलाफातून साकार होणारा ‘वसंतोत्सव’ यंदा दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषेकी
पुणे : सूर, लय आणि ताल यांच्या सुंदर मिलाफातून साकार होणारा ‘वसंतोत्सव’ यंदा दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अद्वितीय संगीताने सजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाच्या १००व्या प्रयोगाचे औचित्य साधून रसिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महोत्सव विनामूल्य असणार आहे, अशी घोषणा गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ‘वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. १५) सुरुवात सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने होईल. त्यानंतर किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांचे गायन होईल. प्रसिद्ध सुफी गायक वडाळी ब्रदर्स यांच्या सुफी संगीताने सांगता होईल. मीरा प्रसाद यांच्या सतारवादनानंतर सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचा शंभरावा प्रयोग हे दुसऱ्या दिवसाचे (दि. १६) खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये प्रथमच लाईव्ह आॅपेरा प्रकाराने या नाटकाचे सादरीकरण करण्यात येईल. यामध्ये राहुल देशपांडे हे खां साहेबांच्या भूमिकेत असतील, सुबोध भावे हे कविराजांच्या भूमिकेत दिसतील, तर महेश काळे हे सदाशिवची भूमिका साकारतील. विशेष म्हणजे या प्रयोगास सध्या गाजत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात खाँ साहेबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची उपस्थिती असणार आहे.
तिसऱ्या दिवशी (दि. १७) प्रल्हाद तिपानिया यांचे गायन, तबलावादक कुमार बोस यांचे तबलावादन तसेच जॉर्ज ब्रूक्स व राहुल देशपांडे यांच्या गायन व सॅक्सोफोनच्या फ्युजन रसिकांना अनुभवता येईल.