यंदा पुणे गणेशोत्सव 'खास' ठरणार; बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आवाज ‘म्यूट’ राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:16 PM2020-08-24T17:16:54+5:302020-08-24T17:18:42+5:30
कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘आवाजा’विनाच शांततेत निर्विघ्नपणे पार पडत आहे. हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला दिवसा आणि रात्री ढोल-ताशांचा आणि डिजेचा आवाज धडकी भरवतो. हा आवाज गेल्या काही वर्षांमध्ये कमी कमी होत गेल्याचे दिसून येत आहे. यंदा तर ढोल-ताशा, डिजेंचा आवाजच ‘म्यूट’ असल्याने कानांना काहीच त्रास होणार नाही. कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘आवाजा’विनाच शांततेत निर्विघ्नपणे पार पडत आहे. हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूकीवर बंधने घातली आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गर्दीचा उच्चांक मोडणारी मिरवणूक यंदा मात्र अनुभवता येणार नाही. हा गणेशोत्सव सामाजिक भान जपणारा ठरत आहे. मिरवणुकीचा आवाज अनेकांची डोकेदुखी वाढवत असतो. या विसर्जन मिरवणुकीच्या आवाजाबाबत दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी नोंद करीत असतात. २००१ पासून महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महेश शिंदीकर हा उपक्रम राबवित आहेत. २००१ मध्ये विसर्जन मिरवणुकीचा सरासरी आवाज ९० डेसिबल होता. जो आपल्या कानांसाठी धोकादायक आहे. २००७ ते २०१३ दरम्यान हा आवाज शंभरीच्या वर पोचलेला आहे. मात्र २०१४ पासून त्यात घट होताना दिसत आहे. हा परिणाम आवाजामुळे होणाºया परिणामांच्या जनजागृतीचा असल्याचे निरीक्षण प्रा. शिंदीकर यांनी नोंदविले आहे. ते म्हणतात,‘‘एकंदर परिस्थितीचे वास्तव आणि गांभीर्य पाहून मंडळांनी देखील आपल्या डिजेचा आवाज कमी करण्यावरच भर दिला. तसेच ढोल-ताशांवर मंडळे भर देत आहेत. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत आवाजाची पातळी ९० च्या खाली आली आहे. यंदा तर अजिबातच ध्वनीप्रदूषण होणार नाही. हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
नियमानूसार ध्वनी पातळीची मर्यादा (डेसिबल)
विभाग दिवसा रात्री
औद्योगिक क्षेत्र ७५ ७०
व्यावसायिकक्षेत्र ६५ ५५
निवासी क्षेत्र ५५ ४५
शांतता क्षेत्र ५० ४०
================
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने
गेल्या १९ वर्षात विसर्जन मिरवणुकीतील नोंद
वर्ष सरासरी (डेसिबल)
२००१ ९०.७
२००२ ९०.९
२००३ ९१.५
२००४ ९२.८
२००५ ९४.१
२००६ ९६.२
२००७ १०२.६
२००८ १०१.४
२००९ ७९.१४
२०१० १००.९
२०११ ८७.४
२०१२ १०४.२
२०१३ ११४.४
२०१४ ९६.३
२०१५ ९६.६
२०१६ ९२.६
२०१७ ९०.९
२०१८ ९०.४
२०१९ ८६.२
==========================
सध्या आवाज योग्य पातळीवर ?
सध्या शहरात निवासी ५५ डेसिबलची पातळी हवी असताना ती ६० ते ७० च्या जवळपास जाते. इतर क्षेत्रातील नेमलेल्या पातळीपेक्षा अधिकच नोंद होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद आहे. सध्या मात्र आवाजाची पातळी योग्यतेच्या स्तरावर असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. आता अनलॉक असले तरी पूर्णपणे सर्व गोष्टी सुरू झालेल्या नाहीत.
==================
दैनंदिन कामकाजातील ध्वनीची तीव्रता
* फ्रीज : ५०
* एअर कंडिशनर : ५० ते ७५
* शिलाई मशीन : ६०
* हेअर ड्रायर : ६० ते ९५
* वाहतूक कोंडी : ८५
* कारचा हॉर्न : ११०
* टीव्ही : ७०
* टॉयलेट फ्लश : ७५-८५
* डोअर बेल : ८०
* मिक्सर ग्रार्इंडर : ८०-९०
* फटाके : १५०
* रूग्णवाहिका सायरन : १२०