यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’ उषा मंगेशकर यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 06:46 PM2019-11-22T18:46:14+5:302019-11-22T18:54:11+5:30
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गदिमा स्मृती समारोहामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा
पुणे : स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक घराण्याचा अजोड वारसा लाभलेल्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच मराठी-हिंदी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीसह चित्रपटांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या नीना दिलीप कुळकर्णी यांना ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार दिला जाणार असून, नव्या उभारीच्या आणि प्रतिभेच्या कलाकाराला दिला जाणारा ‘चैत्रबन’ पुरस्कार युवा गायक महेश काळे यांना तर गदिमांची कन्या स्व. प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ गायिका प्रियांका बर्वे हिला प्रदान केला जाणार आहे.
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गदिमा स्मृती समारोहामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योजक डॉ. अरूण फिरोदिया भूषविणार आहेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सिद्धार्थ बेंद्रे सांभाळणार आहेत.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबरोबर 1953 साली आपल्या गीत गायनाचा प्रारंभ करणा-या उषा मंगेशकर यांनी नौशाद यांच्यापासून ते जतीन-ललित संगीतकारांसाठी गाणी गायली आहेत.‘मुंगळा मुंगळा’ हे गीत असो किंवा ’माळ्याच्या मळ्यामंधी, ‘एका हौस पुरवा महाराज’ सारख्या लावण्या अशी त्यांची अनेक गीते अफाट लोकप्रिय झाली आहेत. त्यांना ‘गदिमा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. 21 हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिलीप कुळकर्णी या मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील उमद्या व हरहुन्नरी कलाकाराची पत्नी असलेल्या नीना कुळकर्णी या देखील प्रतिभावंत अभिनेत्री. ‘हमीदाबाईंची कोठी’, ‘महासागर’,‘आधे अधुरे’,‘मायावी सरोवर’ अशी मराठी-हिंदीतील नाटके किंवा’दिले नादान’, ’बादल’, ‘पहेली’ असे त्यांचे हिंदी चित्रपट असोत त्यांच्या अभिजात प्रतिभेला रसिकांनी पसंती दिली आहे. त्या यंदा ‘गृहिणी-सखी-सचिव’ च्या मानकरी ठरल्या आहेत. 11 हजार रूपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीय संगीताचा झेंडा सप्तखंडात फडकवणारा नव्या पिढीचा गायक महेश काळे यांना 5 हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन ‘चैत्रबन’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . पार्श्वगायन आणि अभिनय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेल्या प्रियांका बर्वे हिला ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा विद्यार्थी कु. तेजस लालासाहेब पवार याला ’गदिमा पारितोषिक’ दिले जाणार आहे.