जीवनगौरव पुरस्काराची या वर्षातील हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:06+5:302021-05-21T04:12:06+5:30

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला ...

This year's hat trick of the Lifetime Achievement Award | जीवनगौरव पुरस्काराची या वर्षातील हॅट्ट्रिक

जीवनगौरव पुरस्काराची या वर्षातील हॅट्ट्रिक

Next

डॉ. न. म. जोशी : साहित्य परिषद म्हणजे दुसरे घरच

पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जीवनातला खरा गौरव आहे, असे मी मानतो. यानिमित्ताने २०२१ या वर्षातील माझी जीवनगौरव पुरस्काराची हॅट्ट्रिक झाली,’ अशा भावना डॉ. न. म. जोशी यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केली.

डॉ. जोशी यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १० जानेवारी रोजी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. मसाप जीवनगौरव पुरस्कार हा या वर्षीचा त्यांचा तिसरा जीवनगौरव पुरस्कार ठरला आहे.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, ‘दहावी इयत्तेत भावे स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना मी अगदी दररोज न चुकता साहित्य परिषदेचे भोवती घिरट्या घालायचो. लहानपणापासून साहित्याची आवड असल्याने साहित्यिकांना भेटण्याची कमालीची ओढ होती. परंतु, आत जाण्यास भीती वाटायची. म. श्री. दीक्षित हे तेव्हा साहित्य परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी मला अनेक दिवस तिथे फिरताना पाहिले. ''इथे सारखा काय करतोस रे'', असे त्यांनी दरडावून विचारले. त्यावेळी ''मला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे, असे मी उत्तर दिले. त्या वेळी ते हसले आणि मला हाताला धरून परिषदेच्या पवित्र वास्तूत घेऊन गेले. त्या दिवशी गोपीनाथ तळवलकर, श्री. म. माटे, कवी यशवंत या दिग्गजांना एकत्र भेटण्याचा योग जुळून आला आणि अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. म. श्री. दीक्षित यांनी कवी यशवंत यांना सांगितले की, या मुलाला साहित्यिकांना ''बघायचे'' आहे. त्यावर कवी यशवंत हसले. त्यांनी त्यांच्या कपातला अर्धा चहा मला प्यायला दिला आणि म्हणाले की, आम्हाला बघायला यायला आम्ही वधू आहोत की सर्कशीतले प्राणी? यापुढे परिषदेत साहित्यिकांना बघायला नाही तर ऐकायला येत जा. त्यादिवशी परिषदेशी दृढ नाते जुळले ते कायमचेच!

‘१९७० साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी साहित्य परिषदेला भेट दिली होती. साहित्यिकांना भेटण्याच्या उत्सुकतेने ते आपणहून परिषदेत आले होते. त्यावेळी सुमारे तीस साहित्यिकांबरोबर त्यांनी दोन तास मनमोकळेपणाने चर्चा केली. माझ्या कारकिर्दीत ही घटना घडल्याने ती मनावर कायमची कोरली गेली आहे,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.

Web Title: This year's hat trick of the Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.