यंदा पिफ ‘ऑफलाइन’च ? रसिकांमध्ये उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:24 PM2020-12-02T12:24:41+5:302020-12-02T12:28:26+5:30

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ)  तयारी सुरू आहे. महोत्सवासाठी एंट्री देखील येत आहेत.

This year's International 'PIF' Film Festival 'Offline'? Curiosity among fans | यंदा पिफ ‘ऑफलाइन’च ? रसिकांमध्ये उत्सुकता 

यंदा पिफ ‘ऑफलाइन’च ? रसिकांमध्ये उत्सुकता 

Next

पुणे : डिसेंबर-जानेवारी महिना हा विविध महोत्सवांचा काळ असतो. सांगीतिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या पर्वणींमुळे शहरातील वातावरण कलात्मक होऊन जाते.  परंतु यंदा महोत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने चित्रपट महोत्सव ’ऑनलाइन’ की ’ऑफलाइन’ होणार? याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र ओटीटी प्लँटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज चा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची ‘ऑनलाइन’ चित्रपट महोत्सव अनुभवण्याची मानसिकता नाही. यातच ऑनलाइन चित्रपट महोत्सवांसाठी पायरसीचा मुददा उपस्थित होऊ शकतो. अशा महोत्सवांना प्रायोजकत्व देखील मिळणे मुश्किल होते अशा विविध निरीक्षणातून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांनी महोत्सवासाठी ‘ऑफलाइन’लाच झुकते माप दिले आहे. देशविदेशातील चित्रपट प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले कान्स,व्हेनिससारखे जागतिक महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. ’इफ्फी’ हा प्रत्यक्ष आणि दोन्ही स्वरूपात पार पडणार असला तरी निर्मात्यांनी ऑनलाइनसाठी चित्रपटांच्या पायरसीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

पुण्यात जानेवारी मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ),किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसारख्या महोत्सवांची मेजवानी रसिकांना मिळते.  पार्श्वभूमीवर ऑनलाइन चित्रपट महोत्सव आयोजित करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात आयोजकांशी ’लोकमत’ने संवाद साधला.

’किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख वीरेंद्र चित्राव म्हणाले,  कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट निर्माते चित्रपट का पाठवतात तर त्यांच्या चित्रपटांवर चर्चा व्हावी. जेव्हा तो चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या नंतर प्रदर्शित केला जातो तेव्हा त्याला एक सपोर्ट मिळतो. हा उददेश ऑनलाइन चित्रपट महोत्सवांमध्ये साध्य होत नाही. यातच एखादा चित्रपट ऑनलाइन दाखविला तर तो कसाही पायरेटेड होऊ शकतो. जेव्हा एखादा ऑफलाइन महोत्सव आयोजित केला जातो तेव्हा तो पुणे, मुंबई अशा एका ठिकाणी आयोजित केला जातो. परंतु महोत्सव ऑनलाइन होतो तेव्हा तो  ‘ग्लोबल’ होतो. त्यामध्ये कायदेशीर मुद्दा उपस्थित होऊ शकतो. याशिवाय ऑनलाइन महोत्सवाला प्रायोजक मिळण्याच्या शक्यता देखील खूप कमी असतात. महोत्सवात किती नवीन चित्रपट प्रदर्शित होतात हे देखील महोत्सवाचे आकर्षण असते. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते.  त्यामुळे आमच्यासमोर ऑनलाइन चित्रपट महोत्सव घेण्यासंदर्भात अनेक अडचणी आहेत. तो ऑफलाइन घ्यायचा की ऑनलाइन घ्यायचा याबाबतचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ.
----------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ)  तयारी सुरू आहे. महोत्सवासाठी एंट्री देखील येत आहेत. मात्र महोत्सव कशा स्वरूपात घ्यायचा नि कधी घ्यायचा? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. येत्या 10 दिवसांमध्ये चित्र नक्की स्पष्ट होईल. 
- डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
---------------------------------------------------------------------------------------------------------
इफ्फी आणि पिफच्या तारखा एकाच वेळी, पिफ पुढे ढकलला जाण्याची शक्यता?
गोव्यात येत्या 16 ते 24 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान पुण्यातही दि. 14 ते 21 जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पार पडणार आहे. हे दोन्ही महोत्सव एकाच वेळी येत असल्याने पिफच्या तारखा पुढे ढकलण्यासंबंधीचा विचार सुरू झाला आहे. कदाचित पिफ मार्च पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: This year's International 'PIF' Film Festival 'Offline'? Curiosity among fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.