एफटीआयआय आणि एसआरएफटीआय च्या संयुक्त प्रवेशासाठी यंदा विक्रमी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 08:14 PM2019-02-08T20:14:28+5:302019-02-08T20:16:56+5:30
एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित येतात.
पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ( एसआरएफटीआय) या संस्थाच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी देशभरातून 6125 इतके विक्रमी अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 1981 अर्ज अभिनय अभ्यासक्रमासाठी प्राप्त झाले असल्याची माहिती एफटीआयआय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित येतात. या दोन संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यायला लागू नये; म्हणून संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे दोन्ही संस्था प्रशासनाच्या विचाराधीन होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. मात्र गेल्या वषीर्पासून ही संयुक्त परीक्षा घेण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी या संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी 5292 इतके अर्ज आले होते. त्यामध्ये यंदा 833 इतक्या अर्जांची वाढ झाली असून, 6125 इतके विक्रमी अर्ज परीक्षेसाठी प्राप्त झाले आहेत. यामध्ये अभिनयासाठी सर्वाधिक 1981 , त्यापाठोपाठ दिग्दर्शन आणि पटकथालेखन अभ्यासक्रमासाठी 1280 तर सिनेमँटोग्राफीसाठी 884 अर्ज प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले आहेत. याशिवाय टेलिव्हिजन अँंड इलेक्ट्रॉनिक अँंड डिजिटल मीडिया ( इडीएम) अभ्यासक्रमासासाठी टीव्ही डायरेक्शन अँंड प्रॉड्युसिंग अँंड डायरेक्शन 388, इलेक्ट्रॉनिक सिनेमँटोग्राफी 352 आणि व्हिडिओ एडिटिंग अँड एडिटिंग करिता 199 अर्ज सादर झाले आहेत.
एफटीआयआय आणि एसआरएफटीआय या दोन संस्थांची संयुक्त लेखी प्रवेश परीक्षा दि. 24 फेब्रुवारी रोजी २०१९ या शैक्षणिक वर्षांच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार आहे. या दोन संस्थांपैकी किमान एका तरी संस्थेत प्रवेश मिळवून चित्रपट विषयाशी संबंधित विविध विषयांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा देता येईल. देशातील २६ केंद्रांवर जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईटी २०१९) घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न असे या परीक्षेचे स्वरूप असेल. लेखी परीक्षेतील निकालानुसार पुढील प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------