31st December: यंदाचा थर्टी फर्स्ट घरात? ओमायक्रॉनने वाढवली तरुणाई अन् हॉटेल चालकांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:36 PM2021-12-21T17:36:41+5:302021-12-21T17:36:49+5:30
३१ डिसेंबरची तयारी करायची की नाही या चिंतेत हॉटेलचालक आहेत तर घरातच थांबायचे की निघायचे बाहेर असा प्रश्न तरूणाईला पडला आहे.
पुणे : कोरोनामुळे गतवर्षाच्या अखेरची मौजमजामस्ती सक्तीने घरातच करावी लागली. यावर्षी थर्टी फर्स्ट च्या तयारीचा विचार सुरू करायचा तोपर्यंत ओमायक्रॉन हा नवा विषाणू येऊन थडकला, आता करायचे काय? ३१ डिसेंबरची तयारी करायची की नाही या चिंतेत हॉटेलचालक आहेत तर घरातच थांबायचे की निघायचे बाहेर असा प्रश्न तरूणाईला पडला आहे.
काय होते ३१ डिसेंबरला?
काही वर्षांपासून या दिवसाला उत्सवी स्वरूप आले आहे. मोठ्या रस्त्यांवर तर जल्लोषच साजरा होता. बरोबर रात्री बारा वाजता फटाके फोडले जातात. हॉटेलमध्ये पार्ट्या रंगतात. मोटारबाईक घेऊन त्या जोरजोरात आवाज करत रस्त्यांवर फिरवल्या जातात. चौकांचौकांमध्ये वर्षअखेर साजरी होती. त्यात आता उदयोन्मुख पुढारी, तरूणांच्या जीवावर राजकारण करणारे पदाधिकारी यांची भर पडली आहे. त्यामुळे उत्साहाला तोटा नसतो.
आर्थिक उलाढाल?
फक्त पुण्यात या एका रात्रीचा एका चांगल्या उंची हॉटेलचा गल्ला किमान १ लाख रूपये तरी असतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. लहानमोठे बार रेस्टॉरंट वेगळेच. एकूण हॉटेलची संख्या विचारात घेतली तर किमान ६० ते ७० लाख रूपयांची उलाढाल या एका दिवसात होत असावी असे त्यांचे मत आहे. हॉटेलांच्या सजावटीचा खर्च विचारात घेतला तर कोटभर रूपये उडत असावेत.
मागील वर्षी काय झाले?
कोरोनामुळे मागील वर्षी सगळेच बंद होते. रस्त्यावर यायला परवानगीच नव्हती. त्यामुळे जी काही मजा करायची होती ती सगळी घरातच झाली. हॉटेलचालकांचे यात सर्वात मोठे आर्थिक नुकसान झाले. तरीही पार्सल देण्याची परवानगी असल्यामुळे अनेकांनी त्यातही पैसे कमावले, मात्र नेहमीच्या वर्षअखेर साजरी करण्याच्या तुलनेत तो अगदीच किरकोळ होते.
काय म्हणतात यावर्षी हॉटेलचालक
''तयारी करायची तरी कशी? त्यासाठी खर्च करावा लागतो. तो केला आणि ऐनवेळी सरकारचा काही निर्णय झाला तर काय करणार? कोरोना टाळेबंदीमुळे आधीच हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सरकारचा निर्णय अगदी अचानक होतो. त्यामुळे यंदाही किरकोळ खर्च वगळता कोणीच फार काही करेल असे वाटत नाही असे पुणे रेस्टॉरंट ॲन्ड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.''
प्रशासनाचा काय विचार आहे?
''कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ओमायक्रॉन नियंत्रणात अजून तरी आहे. ही स्थिती अशीच ठेवायची तर निर्बंध पाळायला हवेत. लवकरच या संदर्भात जिल्ह्याची एकत्रित बैठक होईल. तोपर्यंत सरकारकडूनही काही मार्गदर्शक सुचना येतीलच. त्या व जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन साधारण २८ तारखेला प्रशासकीय निर्णय जाहीर केला जाईल असे जिल्हाधिकारी राजेश देशमूख म्हणाले आहेत.''
तरूणाईला काय वाटतं?
''वर्षअखेर साजरी करण्याची एक वेगळीच मजा असते. कोरोनामुळे मागचे वर्ष सुनेसुनेच गेले, आता यावर्षी हा ओमायक्रॉन आला. निर्बध येणार हे नक्की आहे, ते नाही आले तरी घरातून ओरडा बसणारच आहे. तरीपण जसे जमेल तसे व जेवढी असेल तेवढी, मजा करणारच असे एका महाविद्यालयीन तरुणाने सांगितले.''