येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:17 PM2024-12-03T13:17:19+5:302024-12-03T13:17:51+5:30

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसांत खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो.

Yelkot Yelkot Jai Malhar! Khanderaya's Champashashti festival begins at Jejuri Fort | येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत सोमवारपासून चंपाषष्ठी षडरात्र उत्सवास प्रारंभ झाला. जेजुरी गडकोटात उत्सवमूर्तींना करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत पूजा अभिषेक करून उत्साहात व धार्मिक वातावरणात बालदारीत घटस्थापना करण्यात आली. सोमवारपासून सहा दिवस जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत आहे.

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसांत खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो. उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदिरात पाकाळणी करण्यात आली. मार्तंड भैरव मूर्तीला दही-दूध व तेलाने स्नान घालण्यात आले. सभोवताली गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तींना मिरवणुकीने मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनंतर बालदारीत उत्सवमूर्तींना आणण्यात आले. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तींची स्थापना वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी, मंगेश खाडे यांच्या मंत्रोच्चारात करून घट बसवण्यात आले. यावेळी देवांची महाआरती, भंडारा-खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टी ही करण्यात आली. देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्गाकडून उत्सवमूर्तींना सुवर्ण व चांदीचे दागिने घालण्यात आले.

यावेळी मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पाणसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, अनिल सौंदडे त्याचबरोबर देवाचे सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दीडभाई, देवल बारभाई, चेतन सातभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे, हनुमंत लांघी, समीर मोरे आदींसह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देव संस्थान आणि जयमल्हार चंपाषष्ठी प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

Web Title: Yelkot Yelkot Jai Malhar! Khanderaya's Champashashti festival begins at Jejuri Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.