येळकोट-येळकोट जय मल्हार! जेजुरीत मानाच्या शिखरी काठ्यांची खंडोबा देवभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 07:33 PM2023-02-06T19:33:20+5:302023-02-06T19:34:00+5:30
हा सोहळा नजरेत साठवण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित...
जेजुरी (पुणे) : खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त परंपरेप्रमाणे मानाच्या काठ्या खंडोबा गडाला भेटविण्याचा सोहळा भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण, आणि येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा नजरेत साठवण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते.
जेजुरी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत सालाबादप्रमाणे ठरलेले नियम पाळून काठ्यांची देवभेट उरकण्यात यावी, असे ठरले होते, त्याच पद्धतीने सोहळा पार पडला, भाविकांनी काठ्यांसोबत गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता संगमनेरकर होलम राजाची मानाची काठी खंडोबा गडावर येऊन मंदिराला भेटली. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक होळकरांची शिखर काठी आणि इतर प्रासादिक काठ्या होत्या. तर दुपारी १.३० वाजता सुपेकर खैरेंची काठी व इतर प्रासादिक काठ्या खंडोबा गडावर वाजत-गाजत मिरवणुकीने आल्या. यावेळी खंडोबा गडावर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप व कर्मचाऱ्यांनी, तसेच पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी त्यांचे स्वागत केले.
संगमनेरची मुख्य शिखरी काठी इतर काठ्यांसह सकाळी १० वाजता चिंचेच्या बागेतून निघाली. वाटेत होळकरांचे छत्री मंदिर, मारुती मंदिराला भेटून चावडीवर रामभाऊ माळवदकर पाटील आणि तायप्पा खोमणे पाटील यांचा मान स्वीकारून ११ वाजेच्या सुमारास शिखरी काठ्या गडावर पोहोचल्या. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत हजारो भक्त वाद्यवृंदाचा तालावर नाचत होते. पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण झाल्याने सारा गड सोनेरी झाला होता. यावेळी भाविकांच्या आनंदाला उधाण आले होते.
खंडोबा गडावर देव संस्थानच्या वतीने होलम काठीचे मानकरी तुकाराम काटे, विलास गुंजाळ, आप्पा वरपे, पप्पू काळे, संजय मेहेर, राहुल हिरे, होळकर काठीचे मानकरी बबन बयास, बाळू नातू, शंकर रूपनवर, सचिन नातू तसेच सुपेकर, खैरे काठीचे मानकरी शहाजी खैरे, सुरेश खैरे, शरद खैरे, संजय जमादार यांच्यासह प्रासादिक काठ्यांचे मानकरी आदींचा सन्मान करण्यात आला. मानाच्या काठ्यांबरोबरच इतर प्रासादिक आलेल्या काठ्यांची संख्याही यावर्षी जास्त होती. भाविकांनीही मोठी उपस्थिती दर्शवली होती.