येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा अन् खोबऱ्याच्या उधळणीत खंडोबा निघाले कऱ्हा स्नानाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:11 AM2023-02-20T09:11:13+5:302023-02-20T09:11:26+5:30
राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा सकाळी ७ वाजता कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर पडला. यावेळी देवाचे नित्य वारकरी आणि हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटच्या गजरात भंडार खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली.
आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच सूर्याला अमावस्या असल्याने याच काळात खंडोबा म्हाळसाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नान करणे अपेक्षित असल्याने सकाळी ७ वाजता सोहळ्याने प्रस्थान ठेवले. देवाचे मानकरी पेशव्यांनी इशारत करताच खांदेकरी, मानकरी, उत्सव मूर्तींची पालखी उचलली. बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. भंडार खोबऱ्याच्या उधळणीत आणि देवाच्या जयघोषात पालखी ने मुख्य गडकोटला प्रदक्षिणा घालुन पालखी बालदारीत आणण्यात आली. देवाच्या पुजारी सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्तींना पालखीत स्थानापन्न केले आणि मोठ्या जल्लोषात सोहळा गडकोटाबाहेर पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली. मार्तंड देव संस्थान चे माजी विश्वस्त संदीप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ,व्यवस्थापक सतीश घाडगे, गणेश डीखळे आदिंनी सोहळ्याचे नियोजन केले होते. दुपारी १२ वाजता सोहळ्याचे कऱ्हा नदीवर विधिवत स्नान होऊन सोहळा माघारी चे प्रस्थान ठेवणार आहे.