येळकोट येळकोट जयमल्हार गर्जनेने दुमदुमली जेजुरी नगरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:19 PM2018-04-16T18:19:43+5:302018-04-16T18:19:43+5:30

‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा खोब-याची उधळण करीत दीड लाखांवर आलेल्या भाविकांनी सोमवतीची वारी पूर्ण केली.

Yelkot Yelkot Jay malhar roaring sound at Jejuri Nagari | येळकोट येळकोट जयमल्हार गर्जनेने दुमदुमली जेजुरी नगरी 

येळकोट येळकोट जयमल्हार गर्जनेने दुमदुमली जेजुरी नगरी 

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्रीपासून जेजुरीत रंगला मर्दानी उत्सव.राज्यभरातून आलेले हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी बंदुकीच्या फैरींनी सोहळ्याला सलामी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीत मध्यरात्री दीड वाजेपासून सोमवती यात्रा उत्सव सोहळा सुरू झाला. आज सकाळी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवत ७ वाजता क-हा नदीवर उत्सवमूर्तींना विधिवत स्नान अभिषेक स्नानाने सोमवती यात्रेची सांगता झाली. संपूर्ण पालखी सोहळा रात्रीच्या वेळी पार पडल्याचा अनुभव भाविकांनी प्रथमच अनुभवला.  
रविवारी(दि.१५) रोजी सकाळी साडेआठ नंतर चैत्र अमावास्येला प्रारंभ झाला होता. कालपासूनच जेजुरीत भाविकांची गर्दी होती. आज सकाळी सव्वासात वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ होता. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावास्येचा स्पर्श होत असल्याने सोमवती यात्रा भरवण्यात आली होती. ‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा खोब-याची उधळण करीत दीड लाखांवर आलेल्या भाविकांनी सोमवतीची वारी पूर्ण केली. शालेय सुट्ट्या ,विवाहाचे दिवस आणि गावोगावच्या जत्रे-यात्रेचा हंगाम असल्याने रविवारपासूनच जेजुरीत भाविकांची लक्षणीय गर्दी होती. विशेषत: ठाणे, मुंबई, रायगड कोकणातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी जेजुरीत मुक्कामी आले होते.     
काल मध्यरात्रीनंतर पेशव्यांच्या इशारतीने मध्यरात्रीनंतर दोन वाजता देवाच्या उत्सव मूर्तींच्या पालखी सोहळ्याने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून कऱ्हेच्या स्नानासाठी प्रस्थान केले. यावेळी बंदुकीच्या फैरींनी सोहळ्याला सलामी देण्यात आली. सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’ तसेच ‘सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोब-याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडा-यात न्हाऊन निघाला होता. पालखी सोहळा गड कोटातून क-हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानक-यांनी उत्सव मूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलयापार पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन सोहळा क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. 
गडकोटातून सुमारे पाच किमी अंतरावर असणा-या कऱ्हेकाठी उत्सवमूर्तींच्या पालखीचा सोहळा रात्रीच्या वेळी जाणार असल्याने या पालखी मार्गावर देवसंस्थानकडून पुरेशा उजेडाची सोय निर्माण केली होती. राज्यभरातून आलेले हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. सकाळी साडेसहा वाजता सोहळा कऱ्हेकाठी विसावला. सोहळ्याबरोबर आलेल्या भाविकांनी क-हा स्नान केले. त्याचबरोबर कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रमही पूर्ण केले. सकाळी ७ वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकऱ्यांनी उत्सव मूर्तींना विधिवत स्नान घातले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, रानमळा, कोरपडवस्ती, दवणे मळा येथील मान स्वीकारत सकाळी ९ वाजता  सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमारा वाटप करून झाल्यावर सोहळ्याची सांगता झाली.

Web Title: Yelkot Yelkot Jay malhar roaring sound at Jejuri Nagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jejuriजेजुरी