येलवाडीत इंद्रायणी नदीत तरुण बुडाला, जवानांनी मृतदेह इंद्रायणीतून शोधून काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:17 PM2018-05-27T23:17:14+5:302018-05-27T23:17:14+5:30
येलवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षांच्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.
चाकण : येलवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षांच्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( २७ ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
केतन राजेश गायकवाड ( वय १९, रा.येलवाडी, ता.खेड, जि.पुणे ) असे नदीत बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची खबर संजय चिंतामण गायकवाड ( वय ४१, रा.येलवाडी, ता.खेड ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. केतन हा पुण्यात आयटीआय मध्ये शिक्षण घेत असून तो सुट्टीनिमित्त गावाला आला होता.
संजय, केतन व तेजस बोत्रे हे स्मशानभूमीजवळ नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना केतन पाण्यात बुडाला. पोलीस पाटील प्रदीप शांताराम गायकवाड यांनी घटनेची माहिती फोनवरून पोलिसांना कळविली. त्यानंतर सुदुंबरे येथील एनडीआरएफ च्या जवानांनी घटनास्थळी बुडालेला मृतदेह काढला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद भोसले पुढील तपास करीत आहेत.